प्रजासत्ताक मेळघाटात पुनर्वसित आदिवासींची फरपट

0
954
Google search engine
Google search engine

आदिवासीयांच्या जंगलात फॉरेस्टचे साम्राज्य

अकोट/तालुका प्रतिनिधी

शेकडो वर्षांच्या गुलामगिरीतून प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून देश उभा झाला. यशाची अन प्रगतीची नवी पहाट या राष्ट्राने आजवर अनेकदा पाहिली, मात्र या देशातील विकासाच्या मुख्य प्रवाहापासून आजही दूर असणारा आदिवासी त्यांची होणारी परवड त्यांच्या जगण्याची फरपट मेळघाटातील पुनर्वसीत आदीवासियांच्या आंदोलनाने आणखी एकदा चव्हाट्यावर आली आहे.मेळघाट यापूर्वी गाजला तो कुपोषणासाठी कोवळ्या पानगळीसाठी अन आज मेळघाट परत गाजतोय तो मेळघाटच्या भूमिपुत्र आदिवासी यांच्या जंगलातून स्थलांतराच्या आंदोलनाच्या प्रश्नावरून.

संपूर्ण भारतात आदर्श पुनर्वसनाचे मॉडेल म्हणून प्रचार केल्या गेलेल्या मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील आदिवासींचे आकोट तालुक्यात केलेले पुनर्वसन हे सध्या वादाच्या भोवर्‍यात सापडले आहे. मेळघाटातील केलपाणी ,सोमठाणा,धारगड,गुल्लरघाट,दहीखेल फुटकर,अमोना व इतर गावातील आदिवासी यांनी पुनर्वसनाचा योग्य मोबदला व सोयी सुविधा नसल्याच्या कारणावरून आंदोलनाचा एल्गार पुकारला आहे. या आंदोलनाने मेळघाटातील दुर्गम दऱ्यांखोऱ्यांच्या जंगलात हिंसाचार उफाळला होता.या सशस्त्र संघर्षात आदीवासीयांसह ५० च्या वर शासकीय अधिकारी ,कर्मचारी जखमी झालेत, अनेक लोक बेपत्ता झाले ,शांत असणाऱ्या जंगलात आगडोंब उसळला.

मेळघाटातील या आपातकालीन परीस्थीतीने प्रजासत्ताक भारतात आदिवासीयांची होणारी फरपट पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. विशेष म्हणजे आदिवासी यांच होणारं हे आंदोलन तिसऱ्यांदा झाले आहे.सातत्याने न्याय मागणाऱ्या आदीवासियांचा संयम पाहणारी ही व्यवस्था खरच प्रजासत्ताक आहे का…? असा प्रश्न पडावा एवढा सावळागोंधळ पुनर्वसनाची प्रक्रिया राबवणाऱ्या शासन-प्रशासन व्यवस्थेकडे पाहून पडतो.ही दुर्भाग्यपुर्ण घटना पाहुन हा प्रश्न मेळघाटातील आदिवासीसह सर्वसामान्यांनाही अस्वस्थ करतो आहे.

एकंदरीतच या उग्ररूप धारण केलेल्या या समस्येने प्रजासत्ताक व्यवस्थेत माणूस माणसाचं जगणं हे दुय्यम…व.जंगल अन जंगलाचे कायदे हे प्राधान्याचे ठरत असल्याचे चित्र दिसते आहे…?विकासाच्या लाटेत जंगलाविना होणारी आदिवासींची ही फरफट व्यवस्थेतील प्रशासकीय मारामार सिद्ध करणारी आहे. एवढी ही बाब दुर्भाग्यपूर्ण आहे. या घटनेवरून आदिवासींना मुख्य प्रवाहात सामावून घेताना प्रजासत्ताक व्यवस्था कमी पडते की काय असा प्रश्न सध्या समाज अभ्यासकांसह मेळघाटातील आदीवासीयांना पडतोय एवढे मात्र नक्कीच…