स्वतःचे दुःख लपवुन इतरांना लढण्याचे बळ देणारे ज्येष्ठ नेते चंद्रकांत उपाख्य भैय्यासाहेब ठाकूर जयंतीनिमित्त विशेष !

0
1251
Google search engine
Google search engine

स्वतःचे दुःख लपवुन इतरांना लढण्याचे बळ देणारे ज्येष्ठ नेते चंद्रकांत उपाख्य भैय्यासाहेब ठाकूर जयंतीनिमित्त विशेष !

रुपेश वाळके विशेष प्रतिनिधी /

वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचा वारसा , प्रभाव लाभलेले एक स्वाभिमानी आणि तडजोड न करणारे व्यक्तिमत्व म्हणजे माजी आमदार स्व. भैयासाहेब ठाकूर.

दरवर्षी आदरणीय भैयासाहेब यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम, आरोग्य शिबीर, रक्तदान शिबिर, शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाना मदत देऊन आम्ही युवक मंडळी साजरा करत असो.
ही परंपरा साहेबांच्या जाण्या नंतर सुद्धा कायम ठेवत असे उपक्रम सुरू ठेवण्याची शिकवण हयात असतांनाच त्यांनी प्रत्येक कार्यकर्त्याला दिली.
सर्व जीवन जनसामान्यांचे प्रश्न पोटतिडकीने सोडवण्यासाठी त्यांनी खर्ची घातले.
तिवसा मतदारसंघातील प्रत्येक गावाचा भौगोलिक, जलस्त्रोताचा अभ्यास त्यांना मुखपाठ होता.
मतदारसंघातील रस्त्यांचे नुतनीकरण असो की नवीन रस्ते प्रस्तावित करणे असो अधिकारी मंडळींना ते चर्चा करतांना कुठला रस्ता नागरिकांच्या दळणवळणासाठी महत्त्वाचा ठरेल हे ते अचूक सांगायचे व पटवून दयायचे.
राजकारणापेक्षा समाजकारणास महत्व देत आरोग्यसेवा, जनसेवा, वेळप्रसंगी मतदारसंघातील विविध प्रश्न आक्रमक रित्या आंदोलन करत प्रशासनाला कसे जागे करायचे याचे मार्गदर्शन सतत करत असत, याचबरोबर शासन दरबारी गावातील , परिसरातील विकासाबाबत पाठपुरावा करण्याचे बाळकडू ते नेहमी द्यायचे.

वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा सहवास लाभलेले भैयासाहेब यांच्या लग्नाची बोलणी करण्यासाठी सुद्धा राष्ट्रसंत मध्यस्थी होते हे विशेष.
वं. गुरूदेव यांच्या जीवन कार्याचा केंद्रबिंदू ग्राम व ग्रामातील माणूस राहिला आहे. या ग्रामांना सर्वसुख सोयीने युक्त असे आदर्श ग्राम निर्माण करून अशा गावांत, समाजात, एकात्मता घडवून आणून त्याचा सर्वांगिण विकास साधण्याचे कार्य भैय्यासाहेब ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार ऍड.यशोमतीताई ठाकूर यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विकास आराखडा अंतर्गत गुरूदेव नगर व मोझरी सह समाविष्ट गावांच्या विकास साधला.
मतदारसंघातील ईतर गावांनी याचा आदर्श घ्यावा याचा पाया रचला गेला तो भैयासाहेब यांच्या संकल्पनेतूनच.
राजकीय इच्छाशक्ती, सकारात्मक दूरदृष्टीकोन, योग्य मार्गदर्शन व अनुभवांची खान असलेले हे व्यक्तिमत्त्व अनेक संकटाना तोंड देत उभं राहल, आयुष्यातील अनेक चढउतार पाहत आमदार यशोमतीताई ठाकूर यांना या क्षेत्रात कणखर व विकासक दूरदृष्टीचा वारसा कायमस्वरूपी देऊन गेले. यासोबतच अनेक युवा नेतृत्वाला , महिलांना, ज्यांची कुवत नव्हती अशा अनेक कार्यकर्त्यांना त्यांनी विविध संस्थावर पदाधिकारी म्हणून जनतेच्या सहकार्याने निवडून आणून संधी दिली व विश्वास टाकला.
आयुष्यातील आलेले अनेक वादळ, संकट, कपटी व संधीसाधू लोकांनी साधलेल्या डावांचा बागुलबुवा न करता न खचता सदैव नावाप्रमाणेच कणखर रहाले , जिव्हाळा जपला तो कौटुंबीक , केवळ राजकीय फायद्यासाठी तर मुळीच नाही.

असे भैयासाहेव उर्फ चंद्रकांत ठाकूर हे नाव अमरावती जिल्ह्यात आणि महाराष्ट्र काँग्रेसमध्ये भैय्यासाहेब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाकूर यांनी एकदा जुन्या चांदूर रेल्वे मतदार संघातून तर, एकदा तिवसा मतदार संघाचे आमदार म्हणून विधानसभेत प्रतिनिधित्व केले होते. १९७८ पासुन युवक काँग्रेसच्या माध्यमातून त्यांनी आपल्या राजकीय जीवनाला सुरूवात केली. तत्कालीन काँग्रेस (आय) पक्षाच्या आघाडीवरील नेत्यांमध्ये भैय्यासाहेब ठाकूर यांचा समावेश होता. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील, बँरि.ए.आर.अंतुले, उपमुख्यमंत्री नाशिकराव तिरपुडे, रामरावजी आदिक, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यासह राज्याच्या तत्कालीन राजकारणातील प्रमुख नेत्यांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. काँग्रेस पक्षात १९७८ चे निष्ठावंत म्हणून जे लोक ओळखले जात, त्यांच्यामध्ये भैय्यासाहेब ठाकूर यांचे नाव प्रामुख्याने घेतले जात असे.

आपल्या सभ्य आणि संयमी आचरणासाठी प्रसिद्ध असलेल्या भैय्यासाहेब यांनी मोठा लोकसंग्रह निर्माण केला होता. स्वतः गर्भश्रीमंत ठाकूर घराण्यात जन्मलेले असले तरी पैसा आणि सत्ता यांचा कठलाही दुराभिमान न बाळगता त्यांनी सतत सर्वसामान्यांचे राजकारण केले. राजकारणात जाती-धर्म विषयक भेदाभेद न पाळता सर्वसमावेशक भूमिका घेत सामान्यांना न्याय देण्याची भूमिका त्यांनी सदैव स्विकारली होती. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या भूमीत त्यांचा जन्म झाला आणि सारे आयुष्य मोझरीत गेल्यामुळे राष्ट्रसंतांच्या राष्ट्रधर्माचा विलक्षण प्रभाव त्यांच्या व्यक्तिमत्वावर होता. त्यामुळेच त्यांना लोकसंग्रह करण्याची विलक्षण हातोटी लाभली होती.
असे हे व्यक्तिमत्त्व कायम आमच्या हृदयात व त्यांना मानणाऱ्या हितचिंतकाच्या मनात सदैव आहेत व राहतील, त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधी भरून निघू शकत नाही आणि त्यांची जागा सुद्धा कुणीच घेऊ शकत नाही असं हे अजातशत्रू असं प्रामाणिक व्यक्तिमत्त्व आजकालच्या मृगजळासारख होत असलेल्या राजकारणी संस्कृतीमध्ये होणे नाही.

वैभव स. वानखडे (पाऊलखुणा)
●नगराध्यक्ष न प तिवसा तथा ●सदस्य जिल्हा नियोजन समिति, अमरावती.