भाजपा सरकारला सत्तेतून हद्दपार करा – २०१९ च्या निवडणुकीत भाजप सत्तेत असल्यास यापुढे निवडणुकाच होणार नाही

0
719
Google search engine
Google search engine
आप प्रदेशाध्यक्ष बिग्रेडीयर सुधिर सावंत यांचे मत
चांदूर रेल्वेत पत्रकार परिषद
चांदूर रेल्वे – (शहेजाद  खान)
देशात भाजप सत्तेवर असून भाजपाला २०१९ च्या निवडणुकीत पराभव करण्याचा प्रमुख उद्देश असुन भाजपा सरकारला सत्तेतुन हद्दपार करा अन्यथा २०१९ च्या निवडणुकीत पुन्हा भाजप सत्तेवर आला तर यानंतर देशात निवडणूकाच होणार नाही. व देश आता चालत आहे त्यापेक्षाही जास्त हुकुमशाही पध्दतीने चालेल असे वक्तव्य आम आदमी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष व माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी चांदूर रेल्वे येथील पत्रकारांशी वार्तालाप करतांना रविवारी विशद केले.
      ब्रिगेडियर सुधीर सावंत हे धामणगाव – चांदूर रेल्वे विधानसभा मतदारसंघात राजकीय आढावा घेण्यासाठी चांदूर रेल्वे येथे आले असतांना स्थानिक हुतात्मा स्मारक येथे पत्रकारांनी त्यांच्याशी माहिती जाणून घेतली. यावेळी पत्रकार परिषदेत बोलतांना सुधिर सावंत म्हणाले की, मी ही काँग्रेसमधून खासदार, आमदार झालो. त्यानंतर राज्यातील विविध बाबीत भ्रष्टाचारामुळे मी बाहेर पडलो. त्यानंतर दिल्ली येथे जाऊन अरविंद केजरीवाल यांचे मुख्यमंत्री कालावधीतील प्रशासनावर खोलवर चिंतन केले. यामध्ये दिल्ली सरकारने बिज बिलात ५० टक्के कपात, नळाच्या पाण्याचे बिल माफ व जनतेच्या आयुष्याशी निगडीत ४० अत्यावश्यक कामे होम डिलेव्हरी देण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्ली सरकार सर्व शासकीय दवाखान्यासह खाजगी दवाखान्यात सुध्दा रूग्णांना मोफत सेवा देत आहे. दिल्ली सरकारच्या सर्व शासकीय शाळा फाइव्ह स्टार करण्यात आल्या. सर्व शासकीय निधी शाळेच्या मूलभूत सोयीसाठी थेट मुख्याध्यापकांना देऊन संपूर्ण खर्चाचा अधिकार शिक्षकांना देण्यात आला. शिक्षणाधिकारी, शिक्षण संचालक हे मध्यस्थ नाही. त्यामुळे शासकीय निधीचा भ्रष्टाचार होत नाही. निधी देण्यामागे मध्यस्थ असले तर भ्रष्टाचार होतो व हेच महाराष्ट्रात सुरू आहे. यामुळे अरविंद केजरीवाल यांच्या प्रशासनाचा प्रभाव होऊन मी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. आम आदमी पार्टीने जे कार्य केले त्यांची चर्चा संपूर्ण देशात होत आहे. परंतु भाजपा सरकारने देशातील भोळ्याभाबळ्या जनतेत जावून निव्वळ भाषणे व घोषणा करून मतदारांना आपल्याकडे आकर्षित केले आहे. मागिल ५ वर्षात हुकुमशाहीचे राज्य करत देशातील गरीब जनतेपासून तर व्यावसायिकांना ही ञास देत आहे. भाजपा सरकार कुठलेही धैर्य, धोरणात्मक निर्णय घेत नसुन मोठ्या उद्योगपतींच्या हातचे बाहुले बनली आहे. शेतकऱ्यांच्या कुठल्याही प्रश्नावर चर्चा नाही व कोणताही मोठा निर्णय आजपर्यंत घेण्यात आलेला नाही. गरीब जनतेला फसविण्याचा एकमेव अजेंडा या भाजपा सरकारने चालविला आहे. म्हणून २०१९ च्या निवडणुकीत भाजपा विरोधी मोहीम सुरू करण्यात आली आहे. संपूर्ण राज्यात माझा दौरा असून पक्षवाढीसाठी  प्रयत्न सुरू आहे. विदर्भराज्य पुरस्कर्ते वामनराव चटप यांच्याशी सुद्धा चर्चा सुरू आहे. काँग्रेस व भाजप नको असेल अशा वर्गांकरिता तिसरा पर्याय म्हणून आम आदमी पार्टी ठरू शकते. पाच राज्यात आम आदमी पार्टी निवडणूक लढविणार असुन यामध्ये महाराष्ट्र, पंजाब, हरियाणा, दिल्ली व गुजरात चा समावेश अशी माहिती सुधिर सावंत यांना पत्रकार परिषदेतुन दिली.
       यावेळी दिल्लीचे तल्ला खान, वर्धा येथील हाजी अली, महिला संयोजक रश्मी तिवारी, अमरावती जिल्हा अल्पसंख्यांक अध्यक्ष बशीरभाई, आरटीआय सेल संयोजक संजय शाहाकार, अम. जिल्हा संयोजक महेश देशमुख, जिल्हा सचिव अॅड. घनश्याम ढोले, धामणगाव विधानसभा संयोजक नितिन गवळी यांची उपस्थिती होती.