चांदूर रेल्वे जि. प. शाळेत न्यायालय व शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करून नियुक्त केले कार्यानुभव निदेशक

0
1281

निदेशकाची नियुक्ती रद्द करून मुख्याध्यापकांवर कारवाईची मागणी

पालकमंत्री, शिक्षणाधिकारी, शिक्षक उपसंचालक यांच्याकडे तक्रार

अमरावती – (विशेष प्रतिनिधी)

न्यायालय व शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करून नियमबाह्य व पात्रता नसतांनाही अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे येथील जिल्हा परिषद शाळेत एका महिलेची कार्यानुभव अतिथी निदेशक म्हणुन नियुक्ती केल्याने ही नियुक्ती रद्द ठरवुन मुख्याध्यापकांवर कारवाईची मागणी पालकमंत्री, शिक्षणाधिकारी, शिक्षक उपसंचालक यांच्याकडे दिलेल्या तक्रारीतुन करण्यात आली आहे.

चांदूर रेल्वे शहरातील जिल्हा परिषद शाळेवर ‘कार्यानुभव अतिथी निदेशक’ हे पद भरण्याचे व कमी करण्याचे अधिकार मुख्याध्यापक यांना आहे. मात्र ते पद भरतांना त्याचे निकष आहे की, सदर अर्जदार स्थानिक असावा व त्याने यापूर्वी कुठेतरी काम निदेशक म्हणून केले असावे. अशातच काही महिण्यापुर्वी जिल्हा परिषद शाळा, चांदूर रेल्वे येथे साईनाथ कॉलनी येथील प्रियंका रमेश वानखेडे यांनी रिक्त जागी अर्ज केला होता व त्यांना तिथे नियुक्ती मिळणे अपेक्षित होते. कारण प्रियंका वानखेडे यांनी धारणी तालुक्यातील गोलाई येथील जिल्हा परिषद शाळेत यापुर्वी कार्य केले आहे. त्याचे प्रमाणपत्र सुध्दा त्यांच्याजवळ आहे. मात्र विद्यार्थ्यांच्या पटसंख्या कमी अभावी त्यांना चांदूर रेल्वेला घरी यावे लागले. परंतु यानंतर चांदूर रेल्वे येथील जिल्हा परिषद शाळेतील रिक्त पदावर मुख्याध्यापक यांनी प्रियंका वानखेडे यांना डावलण्यासाठी २० गुणांची परिक्षा घेतली असून वास्तविक पाहता ही परीक्षा घेता येत नाही व संपूर्ण महाराष्ट्रात फक्त चांदूर रेल्वे येथील जि. प. शाळेतच ही परिक्षा झाल्याचा आरोप त्यांनी केला. व यानंतर नवीन उमेदवारास शाळेत नियुक्ती देण्यात आली. सदर नियुक्ती केलेल्या उमेदवाराची त्या पदासाठी शैक्षणीक पात्रता नसुन केवळ डी.एड. झाले आहे. मात्र त्यांच्याजवळ हस्तकला प्रमाणपत्र (क्राफ्ट डी.एड.) नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. तर दुसरीकडे पात्रता असलेल्या प्रियंका वानखेडे यांना मुख्याध्यापकांनी डावलुन नवीन उमेदवारास नियुक्त केले. नवीन उमेदवारास न्यायालयीन व शासन आदेशानुसार नियुक्ती करण्यास सक्त मनाई आहे. त्यामुळे सदर नियुक्ती रद्द करून या प्रकरणात दोषी मुख्याध्यापक यांच्यावर कारवाई करावी व मला नियुक्ती देण्यात यावी अशी मागणी प्रियंका वानखेडे यांनी केली आहे. याबाबतची तक्रार अमरावती येथील प्राथमिक शिक्षणाधिकारी, पालकमंत्री प्रविण पोटे, अमरावती शिक्षण विभागाचे शिक्षण उपसंचालक, पंचायत समिती अधिकारी यांना दिलेली आहे.

अधिकाऱ्यांची कमालीची उदासीनता

या प्रकरणाची वारंवार तक्रार विविध शासकीय कार्यालयात दिले असतांनाही अधिकाऱ्यांनी या तक्रारीला केराची टोपली दाखवली असुन साधी चौकशी सुध्दा केली नसल्याचे समजते. त्यामुळे ‘पाणी नेमंक कुठं मुरतेय’ याचा शोध घेणे गरजेचे आहे.

शाळा व्यवस्थापन समितीने घेतला होता ठराव

या कार्यानुभन निदेशकाच्या नियमबाह्य नियुक्तीसाठी तत्कालीन शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षाने नियमांना तिलांजली देत केवळ डी.एड. प्रमाणपत्र असलेल्या अर्जदाराला निदेशकपदी घेण्याचा ठराव मंजुर केलाचा आरोप होत आहे. तत्कालीन शाळा व्यवस्थापन समितीने दुसऱ्याही पात्रताधारक उमेदवाराचा विचार करणे महत्वाचे होते.