नवे जिल्हाधिकारी श्री शैलेश नवाल यांनी पदभार स्वीकारला

0
749
Google search engine
Google search engine

अमरावतीचे जिल्हाधिकारी म्हणून श्री शैलेश नवाल यांनी पदभार आज स्वीकारला. यापूर्वी ते वर्धा येथील जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते.
श्री शैलेश नवाल हे भारतीय प्रशासकीय सेवेच्या 2010 च्या बॅचचे अधिकारी आहेत. ते मूळ राजस्थानमधील अजमेर येथील आहेत. ते डहाणू येथे सहायक जिल्हाधिकारी तथा आदिवासी विभागाचे प्रकल्प संचालक म्हणून 2014 पर्यंत कार्यरत होते. त्यानंतर त्यांनी अहमदनगर येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केले. श्री. नवाल हे दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे विद्यार्थी असून, त्यांनी अर्थशास्त्रात एम. ए. ही पदवी प्रथम श्रेणीत प्राप्त केली आहे.
वर्धा येथे जिल्हाधिकारी म्हणून काम करताना उत्कृष्ट काम आणि नवनवीन संकल्पना राबविल्याबद्दल 2017 -18 या वर्षांसाठी श्री. नवाल यांची उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून निवड करण्यात आली.
त्यांनी विविध नाविन्यपूर्ण संकल्पना राबवून लोकाभिमुख व पारदर्शक काम करून प्रशासनात वेगळी ओळख निर्माण केली. महिला बचत गट आणि शेतकऱ्यांना विविध लघु उद्योग उभारण्यासाठी प्रोत्साहित करून त्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेचा निधी देऊन रोजगार निर्मितीसाठी काम केले.
जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी वर्धा जिल्ह्यात नागरिकांना ऑनलाईन सेवा देण्यावर भर दिला. त्यासाठी विविध ई -सेवा सुरू केल्यात. जिल्हाधिकारी कार्यालय पेपरलेस करण्यासोबतच नागरिकांना सर्व योजनांची माहिती एका ठिकाणी घरबसल्या उपलब्ध व्हावी म्हणुन ‘आपल्या योजना’ हे मोबाईल अँप तयार केले. सौर उर्जेवर जल उपसा उपसिंचन प्रकल्प, गुन्हे माहिती व्यवस्थापन प्रणालीची निर्मिती, मायक्रो एटीएम : आपले आधार आपली बँक हा प्रकल्प, महिलांसाठी सोलर पॅनल निर्मिती कारखाना, ‘संवाद’ टोल फ्री हेल्पलाईन आदी अनेक वैविध्यपूर्ण कामे त्यांनी आपल्या यापूर्वीच्या कार्यकाळात केली आहेत.
श्री. नवाल यांनी अमरावती जिल्ह्यात काही काळ परिविक्षाधीन अधिकारी म्हणून काम केले आहे. जिल्ह्यातील कुपोषण निर्मूलनासाठी कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करू. मेळघाटात आरोग्य विभागातील रिक्त पदांची भरती आदी प्रयत्न करण्यात येतील, असे ते आज पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
जिल्ह्यात दुष्काळी भागातील मदतवाटप, सन्मान योजनेच्या याद्या अपलोड करणे आदी तातडीची कामे वेळेत पूर्ण करण्यात येतील. महिला बचत गटांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या माध्यमातून वंचित घटकांचे आर्थिकदृष्ट्या सक्षमीकरण करण्यासाठी कार्यक्रम राबविण्यात येईल. जिल्हा पातळीवरील प्रश्नांचा तात्काळ निपटारा आणि राज्य पातळीवर सुटू शकतील अशा प्रश्नांबाबत पाठपुरावा या कार्यवाहीत सातत्य ठेवून गतिमान प्रशासनाचा प्रयत्न असेल, असेही ते म्हणाले.