आज घुईखेड येथे उसळणार भक्तांचा जनसैलाब – सोळाव्या वर्षी श्री संत बेंडोजी महाराजांनी घेतली समाधी

0
1712
Google search engine
Google search engine

महोत्सवाला ६८१ वर्ष पुर्ण

दहिहांडी व शोभायात्राने दूमदूमणार घुईखेड नगरी

दहिहांडीनंतर यात्रा महोत्सवाला सुरूवात 

चांदूर रेल्वेः- (शहेजाद खान) 

महाराष्ट्र राज्यासह इतर राज्यातील हजारो भाविकांचे श्रध्दास्थान असलेले विदर्भातील एकमेव संजिवन समाधी असलेले श्री संत बेंडोजी महाराज यांनी वयाच्या सोळाव्या वर्षी संजिवन समाधी घेतली होती. इ.स.१३३७ पासुन बेंडोजी महाराजांच्या संजिवन समाधी सोहळा सुरू आहे. आज या सोहळ्याला ६८१ वर्ष पुर्ण झाले असुन आता याला भव्य स्वरूप प्राप्त झाले आहे. आज बुधवारी या महोत्सव निमित्त बेंडोजी महाराजाच्या संजिवन समाधीच्या दर्शनासाठी राज्यभरातील लाखोंचा जनसैलाब उसळणार आहे.

६ ते १२ फेब्रुवारी या काळात संगीतमय भागवत ज्ञानयज्ञ सप्ताह उत्साहात पार पडला असून काल मंगळवारी भागवत कथाचा समारोप करण्यात आला. भागवतचार्य ह. भ. प. कल्पनाताई ठाकुर यांनी सातही दिवस प्रवचन दिले. यामुळे परिसरात सगळीकडे भक्तीमय वातावरण पहावयास मिळाले. यानंतर आज बुधवारी दुपारी १ वाजता नांदगाव (खंडेश्वर) येथील आळंदीकर ह. भ. प. उमेश महाराज जाधव यांचे काल्याचे किर्तन होणार असुन सायंकाळी ४ वाजता भव्य दिव्य दहिहांडी कार्यक्रम होणार आहे. याच दरम्यान बेंडोजी महाराजांची भव्य शोभायात्रा सुध्दा निघणार असून संपूर्ण राज्यभरातील दिंड्या मोठ्या प्रमाणात सामिल होणार आहे. हा अद्भूत सोहळा पाहण्यासाठी यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातील लाखो भाविकांची उपस्थिती राहणार आहे. या सोहळ्यांसाठी पोलीसांचा तगडा बंदोबस्त असून चांदूर रेल्वे बस आगाराने घुईखेड साठी जादा यात्राबसची व्यवस्था केली आहे. बेंडोजी महाराज गुरूदेव सेवा मंडळ व देवस्थानाच्या वतीने भव्य विदर्भ स्तरिय खंजरी भजन स्पर्धेचे आयोजीत केली आहे. १६ व १७ फेब्रुवारी या कालावधीत भव्य विदर्भस्तरिय खंजेरी भजनाचे आयोजन करण्यात आले आहे. दहिहांडीच्या कार्यक्रमानंतर यात्रा महोत्सवाला सुरूवात होणार आहे.

सन १३३७ चा बिल्ला देतो ऐतिहासिक साक्ष

 

संत बेंडोजी महाराजांच्या इतिहास प्राचीन असून संस्थानने सन १३३७ साली तयार केलेला भालदार व चोपदारांचा बिल्ला आजही विश्वता जवळ असुन तो प्राचीन इतिहासाची साक्ष देत आहे.

दिंड्यांची नोंदणी करण्याचे आवाहन

या कार्यक्रमासाठी आज राज्यभरातील दिंड्या सहभागी होणार असुन परिसरातील दिंड्यांनी सुध्दा सहभागी होण्यासाठी संस्थानमध्ये नोंदणी करण्याचे आवाहन संस्थानचे विश्वस्त प्रविण घुईखेडकर यांनी केले आहे. तसेच सहभागी दिंड्यांची ईश्वरचिठ्ठीने महाआरतीसाठी निवड करणार असुन त्या दिंडीला महाआरतीचा मान व साडीचोळीने सत्कार करण्यात येणार असल्याचेही प्रविण घुईखेडकर यांनी सांगितले.

बेंडोजी महाराजांच्या आठवणी

बेंडोजी महाराज जन्म कधी झाला यांची नोंद नाही. मात्र इ.स १३व्या शतकात घुईखेडच्या जंगलात ८ वर्षाचा मुलगा मेंढपाळांना मिळाला. त्यानी त्याला घरी आनले. त्यांच्या पाठीवरील दोन बेेंडामुळे लोेक त्याला बेंडोजी म्हणून लागले. खोलाड नदीच्या किनारी रानावनात गुरे चारण्याचे काम बेंडोजी करीत. एकदा या वनातुन बुध्दीपुरी महाराज जात असतांना बेंडोजींचा अधिकारी म्हणून त्यांच्या शिरावर वरदहस्त ठेवला. गुरूच्या कृपाप्रसादाने बेंडोंजींना ४ दिवस अखंड समाधी लागली. त्यांना गुरूचा अनुग्रह प्राप्त झाला. बुध्दपुरी महाराजांनी त्यांना नाथ संप्रदायाच्या परंपरेत आणुन बसविले.या अनुग्रहानंतर बेंडोजीबाबा अंतर्मुख राहू लागले. सच्चीदानंद बाबाचे कार्य अपुरे असल्यामूळे ते जिवंत आहे असे सांगुन सिध्द करून दाखविले. संतत्वाने लोकसंग्रह वाढू नये यासाठी ते दुर गुरा-ढोरांसमवेत वनात राहू लागले. अशातच नागपूर-पुणे महामार्गावरील तळेगाव दशासरचे रामजी सोनार विश्वासाने व सचोटीने सोन्या-चांदीचा व्यवसाय करीत असतांना त्यांच्यावर पाच तोळ्याचे चांदीचे कडे खोटे दिल्याचा आळ आला. त्यामध्ये त्यांना तुरूंगवास भोगावा लागला. त्याने त्यांच्या मनात वैराग्य निर्मान झाले. तुरूंगातून बाहेर पडल्यावर ते कुठेही फिरू लागले. अशातच त्यांनी रानात बेंडोजी महाराजांना पाहिले. ते त्यांच्या मागे राहू लागले. महाराजांनी त्यांना परत जाण्यास सांगीतले मात्र रामजी गेले नाही.याला ४ महिण्याचा काळ लोटला.यामूळे बेंडोजी महाराज व्यथीत झाले. परंतु रामजीची तळमळ पाहून महाराजांनी त्यांना अनुग्रहीत केले. रामजी सोनार हे त्यांचे पहिले व शेवटचे शिष्य. ” जगाच्या कल्पना संतांची विभुती ” या वचनानुसार स्वतःच्या तप सामथ्र्यांने त्यांनी अनेकांचे जीवन कृतार्थ केले. रामजी महाराज व इतर भक्तांना सांगुन वयाच्या १६ व्या वर्षी त्यांनी समाधी घेतली. संत ज्ञानेश्वर माऊली नंतर स्वतः सांगुन व भक्तांना साक्षी ठेवुन संजिवन समाधी बेंडोजी महाराजांनी घेतली. १३ व्या शतकात माऊलीनी समाधी घेतली व तेथून ३७ वर्षांनी बेंडोजी महाराजांनी समाधी घेतली. तशी इतिहास साक्षी बिल्ले आहे. समाधी नंतर बेंडोजींच्या कृपेने अनेकांचे कल्याण झाले. त्यांचे अनेक चत्मकार व आशिर्वाद भक्तांना आजतोवर प्राप्त झाला. त्यांचे विदर्भात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात लाखो भक्त आहेत. देहू येथील संत तुकाराम महाराज मंदिरात आजही दररोज बेंडोजी महाराजाची काकड आरती गायली जाते. अशा महान विभूतीचे घुईखेड येथे संजिवन समाधी असने जिल्ह्यासाठी नाही तर संपूर्ण विदर्भासाठी पुण्याची बाब आहे.