“हा ‘व्हॅलेंनटाईन’ मायबापा सोबत साजरा करा” – श्री सोपान कनेरकर

0
1970
Google search engine
Google search engine

डेंटल कॉलेज आणि हॉस्पिटल येथे हास्य आणि अश्रुंतून सर्व डॉक्टर्स मंत्रमुग्ध

सोपान कनेरकर यांचे तरुणाईच्या जागरातून भावनिक आवाहन
*अमरावती -* आपली आई जरी सावळी असली तरी आपल्या आईच्या स्तनातले दूध सावळे नाही. आपली भारतीय संस्कृती अंगिकारण्यासाठी कितीही कठीण असली तरी ती आपली संस्कृती आहे. हा विरोध प्रेमाचा नसून तर पाच्छात्य संस्कृतीचा आहे. हि ‘व्हॅलेंटाईन’ संस्कृती समाज निर्मितीचा मोठा अडसर असून आजच्या युवक युवतींनी याकडे गाम्भीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे असे प्रतिपादन ख्यातनाम वक्ते सोपान कनेरकर यांनी डेंटल कॉलेज आणि हॉस्पिटल येथे प्रेरणादायी व्याख्यान व्याख्यान प्रसंगी केले, यावेळी त्यांनी त्यांच्या शैलीतून सर्वांना हास्य आणि अश्रूंतून मंत्रमुग्ध केले.

संस्कार म्हणजे गुणांचा गुणाकार आणि दोषांचा भागाकार. गुणांचा गुणाकार याचा अर्थ स्वतःमधील गुण वाढवायचे आणि दोषांचा भागाकार याचा अर्थ स्वतःमधील दोष अल्प (कमी) करायचे.

काबाडकष्ट करून आई-वडील आपल्या मुलांना मोठे करतात, त्यांना सक्षम बनवतात; पण हीच मुले पैसा कमावण्याच्या नादात आई-वडिलांना विसरतात तेव्हा त्या कुटुंबासारखे दुर्दैवी कोणीही नसते. कर्तबगार मुलांच्या कर्तृत्वाचे कौतुक करण्यासाठी आईचाच हात मुलाच्या पाठीवर हवा. आता समाजवास्तव बदलत चालले आहे. घरात सर्व असते; पण आई मात्र वृद्धाश्रमात असते. त्यामुळे एकवेळ मुले पैशांनी श्रीमंत झाली नाही तरी चालेल; पण ती संस्कारसंपन्न पाहिजेत. जगातले सर्व गुन्हे माफ करणारे न्यायालय म्हणजेच आई! तिची अडचण वाटून जरी तिला वृद्धाश्रमात ठेवले तरीही ती मुलांची आणि नातवंडांची आठवण काढत असते. आज जर श्यामची आई घराघरात निर्माण झाली तर ’निर्भया’ घडणार नाहीत!

आपल्याला बाजारात सर्वकाही विकत मिळते; परंतु आशिर्वाद विकत मिळत नाहीत. ते मिळवावे लागतात. वडिलधार्‍यांशी चांगले वागून त्यांचे आशिर्वाद मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत,आपले पालक आपल्यासाठी चांगली शाळा शोधतात. त्याबदल्यात पाल्याने परिक्षेत चांगले गुण मिळवावेत हीच पालकांची अपेक्षा असते. ती अपेक्षा पूर्ण करण्याचा मनापासून प्रयत्न प्रत्येक विद्यार्थ्याने केला पाहिजे.
‘विद्यार्थी जीवनात शिक्षण हे साध्य नसून साधन आहे . ज्यातून नवचैतन्य, नवसंस्कृती आणि नवसमाज निर्माण करायचा आहे’

यावेळी डेंटल कॉलेज आणि हॉस्पिटलचे अधिष्ठाता गोंधळेकर सर, अंबाडेकर सर, बारब्ध्ये मॅडम, रघुवीरजी देशमुख, स्वप्ना पवार, प्रणित चोपडे, कृनाल वेरुळकर, शास्वत देशमुख व डेंटल कॉलेजचे समस्त विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.

यावेळी कनेरकर पुढे म्हणाले की , संस्कार हा एक चांगला संस्कार पूर्वी मुलांच्या मनावर होत असे. परंतु सध्यस्थितीत ‘वाचाल तर वाचाल’ असे म्हणण्याची वेळ आली आहे. वाचनसंस्कार हा युवापिढीला तर अधिक परिपक्व करू शकतो परंतु काय वाचावे याचे योग्य मार्गदर्शन त्यांना होत नाही. यापेक्षाही महत्वाचे म्हणजे आज वाचन – संस्कृतीवर दूरदर्शन – संस्कृतीने जबरदस्त हल्ला केला आहे. दूरदर्शन – संस्कार हा एक प्रचंड विषय आहे. त्यावर कांही न लिहिणेच उत्तम, या दृकश्राव्य माध्यमाच्या सततच्या मा-यामुळे माणसाच्या माती बधिर झाल्या आहेत.

मानवाच्या ‘अनुकरणप्रियता’ या गुणामुळेच संस्कारप्रसार होत असतो. संस्काराच्या पाय-या चढतचढतच माणुस आदर्शापर्यंत पोचू शकतो. वस्तुतः संस्काराचे दोन प्रमुख प्रकार आहेत. एक म्हणजे कौटुंबिक संस्कार आणि दुसरे सामाजिक संस्कार. मुल जन्माला येते तेव्हां सर्वप्रथम घर हेच त्याचे विश्व असते. घरातील माणसे हीच त्याची आदर्श असतात. कुटुंबियांच्या आपापसातील वागण्याचा चांगला अगर वाईट ठसा मुलांच्या मनावर कोवळ्या वयातच उमटला जातो. मुल जेव्हां घराचा उंबरठा ओलांडू लागते तेव्हां शेजारी व शाळेत जाऊ लागते तेव्हां गुरुजन, शिक्षक हे त्याचेसाठी आदर्शच असतात. परंतु आजच्या काळात आईवडील दोघेही करियरप्रेमी असतात. संस्कार करायला घरात आजी आजोबा असतातच असे नाही.