खरीप हंगामात शेतपिकांच्या नुकसानभरपाईपोटी 10 कोटी रुपये निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग – विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर

0
1159
Google search engine
Google search engine

सांगली, दि. 13, (जि. मा. का.) : खरीप हंगामात शेतपिकांच्या झालेल्या नुकसानीबाबत शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी पहिल्या हप्त्यात सांगली जिल्ह्यासाठी 34 कोटी रूपये निधी उपलब्ध झाला आहे. त्यापैकी 10 कोटी रूपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहेत. उर्वरित निधीही आगामी चार ते पाच दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येईल. दुसऱ्या टप्प्यातील मदतही लवकरच मिळेल, अशी माहिती पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज येथे दिली.यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी खरीप दुष्काळी अनुदान वाटपाचा आढावा घेऊन योग्य त्या सूचना देण्यात आल्या. यावेळी जिल्हाधिकारी वि. ना. काळम, विभागीय कार्यालयाचे उपायुक्त संजयसिंह चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. त्रिगुण कुलकर्णी, कृषि उपसंचालक मकरंद कुलकर्णी, उपजिल्हाधिकारी सर्वश्री अमृत नाटेकर, किरण कुलकर्णी, जिल्हा पुरवठा अधिकारी भानुदास गायकवाड, उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात, तुषार ठोंबरे, अश्विनी जिरंगे, विजय देशमुख, नागेश पाटील, तहसिलदार शरद पाटील आदि उपस्थित होते.विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर म्हणाले, खरीप दुष्काळाच्या बाबतीमध्ये राज्य शासनाने घेतलेल्या निधी वाटपाच्या निर्णयानुसार शेतकऱ्यांना दोन किंवा आवश्यकतेनुसार तीन टप्प्यांमध्ये मदत देण्यात येणार आहे. या मदतींतर्गत सांगली जिल्ह्याला पहिला हप्ता प्राप्त झाला असून, मदत वाटपाची प्रक्रिया सुरू झाली आहे. जिल्ह्यातील 277 गावांमध्ये 1 लाख 28 हजार शेतकऱ्यांच्या याद्या तयार केल्या आहेत. पहिला हप्त्यापोटी राज्य शासनाकडून 34 कोटी रुपये निधी उपलब्ध झालेला आहे. त्यापैकी 10 कोटी रूपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहेत. उर्वरित सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर येत्या तीन ते चार दिवसामध्ये निधी वर्ग करण्यात येईल. त्यानंतर लगेचच दुसऱ्या हप्त्याच्या वाटपाची कार्यवाही सुरू करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.वितरित करण्यात येणारी रक्कम ही बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट जमा करण्यात येणार आहे. त्यामधून कोणत्याही प्रकारची वसुली केली जाणार नाही, असे स्पष्ट करून डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आर्थिक मदतीबरोबरच दुष्काळ घोषित केलेल्या गावांमध्ये 8 विविध प्रकारच्या सवलती लागू करण्यात आल्या आहेत. त्याचीही काटेकोर अंमलबजावणी संबंधित यंत्रणांनी काटेकोरपणे करावी. तसेच, आवश्यकतेनुसार व लेखी मागणीनुसार चारा छावण्या सुरू कराव्यात, अशा सूचना यावेळी दिल्या.00000