राष्ट्रवादी काँग्रेस व मनसेने घेतला भाजपाचा ट्विटरच्या माध्यमातुन समाचार – भाजपा आमदाराने आयोजित केलेल्या कृषी परिषदेच डान्स प्रकरण

0
724

अमरावती – (विशेष प्रतिनिधी)

अमरावतीतील वरूड येथे भाजपने आयोजित केलेली राष्ट्रीय कृषी विकास परिषद अश्लील नृत्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. परिषदे दरम्यान झालेल्या मनोरंजनाच्या कार्यक्रमात निवृत्त नायब तहसीलदाराने पुरुष नर्तिकेसोबत केलेल्या अश्लील डान्सचा व्हिडिओ व्हायरल झाला असून राष्ट्रवादी काँग्रेस व मनसेने या प्रकाराचा चांगलाच समाचार घेतला आहे.

वरूड येथे भाजप आमदार डॉ. अनिल बोंडे यांच्या पुढाकाराने ८ ते ११ फेब्रुवारीदरम्यान या कृषी विकास परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत ९ फेब्रुवारी रोजी झालेल्या लोककला दंडार या कार्यक्रमातील अश्लील डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
या कार्यक्रमात महिलेची वेशभूषा करून पुरुष नृत्य करतात. या माध्यमातून समाजप्रबोधन करण्याचा उद्देश असतो. मात्र, जो व्हिडिओ व्हायरल झाला आहे त्यात समाजप्रबोधन सोडून निव्वळ अश्लीलता असल्याने ही परिषद वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. यावर राष्ट्रवादी आणि मनसेने तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला आहे.

राष्ट्रीय कृषी परिषद की डान्सबार?, असा सवाल करत राष्ट्रवादीने या प्रकारावर टीकास्त्र सोडले आहे. भाजप आमदाराने शेतकऱ्यांना मदत करण्याच्या नावाखाली कृषी विकास परिषद आयोजित केली खरी पण प्रत्यक्षात या परिषदेच्या व्यासपीठाचा वापर अश्लील नाच-गाण्यांसाठी झाला, अशाप्रकारचे ट्विट राष्ट्रवादीने केले आहे. महाराष्ट्रात शेतकरी दुष्काळामुळे बेजार झालेला असताना भाजप आमदारांच्या कृषी परिषदेत मात्र डान्सबार भरवण्यात आला, असा निशाणा मनसेने ट्विटरच्या माध्यमातून साधला आहे.