*65 वर्षात झाले नाही ते पाच वर्षात केले, म्हणूनच… “फिर एकबार मोदी सरकार’ : पंकजा मुंडे*

0
794

आकाश हिवराळे / औरंगाबाद:-

स्वातंत्र्य काळापासूनच्या 65 वर्षात जेवढा विकास झाला नाही, तेवढी विकास कामे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारने पाच वर्षात केल्याचा दावा करतांनाच म्हणून ‘फिर एकबार मोदी सरकार’ असे आवाहन राज्याच्या महिला बालकल्याण व ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी औरंगाबादेत पत्रकार परिषदेत केले.

‘भारत के मन की बात’ अभियानाअंतर्गत पंकजा मुंडे यांच्यावर औरंगाबाद जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्राशी संबंधित उद्योजकांशी संवाद साधून त्यांच्या सूचना, प्रश्‍न जाणून घेण्याची जबाबदारी पंतप्रधान कार्यालयाने सोपवली आहे. या सदंर्भात पत्रकारांना माहिती देतांना त्यांनी पाच वर्षातील मोदी सरकारच्या कामगिरीची तुलना 65 वर्षाच्या सत्ता काळाशी केली. रस्ते, वीज, पायाभूत सुविधा, जागतिकस्तरावर देशाचा वाढलेला मान, शत्रुराष्ट्रांवर जरब, देशातील गरीबांना हक्काचे घर, उज्वला गॅस, आयुष्यमान योजनेच्या माध्यमातून पुरवण्यात येणाऱ्या आरोग्य सुविधांची माहिती देतांनाच देशाचा विकास झपाट्याने होत असल्याचा दावा आकडेवारीसह केला.

‘भारत के मन की बात’ अभियानाची माहिती देतांना पंकजा मुंडे म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशावरून पंतप्रधान कार्यालयाने देशभरातील अनेक राज्यात हे अभियान राबवण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील प्रत्येक घटकाशी चर्चा करून त्यांच्या मनातील प्रश्‍न, सूचना जाणून घेण्याचा या मागचा हेतू आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी बिहारमधील पक्षाचे नेते सुशीलकुमार मोदी, केंद्रीय मंत्री पीयुष गोयल स्टार्ट अप इंडिया, लघु उद्योजकांशी चेर्चेसाठी शाम जाजू (नाशिक), माहिती तंत्रज्ञानाविषयी व्हि. के. सिंग (पुणे) आणि पर्यटना विषयीच्या सूचनासाठी औरंगाबादेत माझी तर कुशल मौर्य यांची ऊस व साखर प्रश्‍नावर चर्चेसाठी (कोल्हापूर) नियुक्ती करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.

जनतेच्या सूचनांचा जाहीरनाम्यात समावेश…
पंतप्रधान मोदी यांनी नेहमीच “मन की बात’ च्या माध्यमातून देशातील जनतेशी संवाद साधला आहे. आता भारत के मन की बात मधून जनतेच्या मनातील प्रश्‍न जाणून घेण्याचा हा प्रयत्न आहे. त्यासाठी ‘आकांक्षा बॉक्‍स’ भारत के मन की बात, च्या माध्यमातून सर्वसामान्यांकडून आलेल्या विविध क्षेत्राविषयची सूचना थेट पंतप्रधान कार्यालयापर्यंत पोहचणार आहेत. त्यातील चांगल्या सूचनांचा समावेश पंतप्रधान मोदी आपल्या निवडणुक जाहीरनाम्यात करणार असल्याचे पंकजा मुंडे यांनी सांगितले.