जबलपुर एक्सप्रेस, पॅसेंजर गाड्या रद्दमुळे प्रवाशांचे हाल – गाड्या तत्काळ सुरू करण्याची मागणी

0
1231

चांदूर रेल्वे – (शहेजाद खान )

     सर्वसामान्यांना माफक दारात प्रवास घडविणाऱ्या नागपूर – भुसावळ मार्गावरील सर्व पॅसेंजर गाड्या तब्बल दिड महिन्यासाठी रद्द करण्यात आल्या आहे. यापाठोपाठ अमरावती – जबलपुर एक्सप्रेस सुध्दा रद्द झाली असुन या रेल्वे गाड्या रद्द झाल्यामुळे चांदूर रेल्वे तालुक्यातील प्रवाशांचे हाल होत असुन या गाड्या तत्काळ सुरू करण्याची मागणी शहरातुन होत आहे.

      नागपूर ते भुसावळ दरम्यान रेल्वे कोळसा प्रेषण आणि अतिरिक्त माल वाहन मार्गाच्या कामासाठी सदर मार्ग बंद असल्याचे समजते. नागपूर – भुसावळ दरम्यान चालणाऱ्या पॅसेंजर गाड्यांमध्ये रोज हजारो प्रवासी ये-जा करतात. नागपूर-भुसावळ दरम्यान चालणाऱ्या पॅसेंजर गाड्यांमध्ये रोज हजारो प्रवासी ये-जा करतात. मात्र ५१२६० / ५१२५९ नागपूर- वर्धा १५ फेब्रुवारी ते ३१ मार्चपर्यंत,५१२८६ / ५१२८५ नागपूर – भुसावळ १५ फेब्रुवारी ते ३१ मार्च व ५१२६१ / ५१२६२ अमरावती – वर्धा या पॅसेंजर रेल्वे गाड्या बंद करण्यात आल्या आहे. याशिवाय , १२१५९ अमरावती ते जबलपूर  ट्रेन १६ फेब्रुवारी ते १ एप्रिलपर्यंत अमरावती ते नागपूरपर्यंत रद्द करण्यात आली आहे व १२१६०  जबलपूर – अमरावती ट्रेन १५ फेब्रुवारी ते ३१ मार्चपर्यंत नागपूर ते अमरावतीपर्यंत रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे आता सकाळी नागपुर वरून चांदूर रेल्वेकडे येण्यासाठी व सायंकाळी, रात्री चांदूर रेल्वे वरून नागपुर कडे जाण्यासाठी एकही ट्रेन नाही. सामान्य प्रवाश्यांना यामुळे बराच त्रास सहन करावा लागत आहे. तसेच विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणीक नुकसान होत आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून रेल्वे प्रशासनाने तत्काळ रेल्वे गाड्या पुर्वरत सुरू करण्याची मागणी शहरातुन होत आहे.

……अन्यथा पर्यायी व्यवस्था करा – नितीन गवळी

सदर रेल्वे गाड्या रद्द केल्यामुळे प्रवासी, विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत असुन रेल्वे प्रशासनाने सदर गाड्या लवकरात लवकर सुरू कराव्या. किंवा पर्यायी व्यवस्था म्हणुन इतर सुपरफास्ट रेल्वे गाड्यांना चांदूर रेल्वे स्टेशनवर थांबा देण्यात यावा. अन्यथा जनआंदोलनाशिवाय पर्याय राहणार नसल्याचा इशारा रेल रोको कृती समितीचे अध्यक्ष नितीन गवळी यांनी दिला आहे.