आकोटात प्रगटदिन महोत्सवानिमित्य मिरवणुक

0
1161
Google search engine
Google search engine

आकोट, दि.25 :- अंजनगाव मार्गावरील गजानन महाराज मंदिर संस्थान येथे श्रींचा प्रगट दिन महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रगट दिन महोत्सवानिमित्य शहरातून श्रींची भव्य पालखी मिरवणुक काढण्यात आली. प्रगट दिन महोत्सवानिमित्य 18 ते 25 फेब्रुवारी पर्यंत हभप सुभाष महाराज काळे आळंदी देवाची यांच्या वाणीतून श्रीराम कथा सप्ताह पार पडला.

सोमवारी गजानन महाराज मंदिरात पहाटे महाराजांचा अभिषेक, पुजाअर्चा, आरती करण्यात आली. हभप सुभाष महाराज काळे यांच्या काल्याच्या किर्तनानंतर महाप्रसाद वितरण करण्यात आले. तद्नंतर शहरातून श्रींची पालखी मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत भजनी मंडळ, दिंड्यासह पालखी तसेच ट्रॅक्टरवर महाराजांची मुर्ती विराजमान करण्यात आली होती. पालखी मिरवणुकीमध्ये मोठ्या संख्येने भाविक भक्त सहभागी झाले होते.

स्थानिक भुलजाभुलाई चौकात भुलजाभुलाई गृपच्या वतीने पालखीचे पुजन व महाप्रसादाचे वितरण केले. तसेच विविध संस्था, संघटनांतर्फे चहापाणी, फराळाचे वाटप करुन स्वागत करण्यात आले. कथा सप्ताह व प्रगट दिन उत्सवाकरिता श्री गजानन महाराज मंदिर विश्वस्त , उत्सव समिती च्या पदाधिकारी, कार्यकर्ते व गजानन नगरवासीयांनी परिश्रम घेतले.