६० वर्षावरील शेतकरी शेतमजुरांना दरमहा पाच हजार रुपये पेन्शन द्या – जनता दल सेक्युलर ची मागणी

0
697
Google search engine
Google search engine
संजय गांधी व श्रावणबाळ योजनेचे मानधन 600 वरून दोन हजार रुपये करण्याचीही मागणी
मुख्यमंत्र्यांना पाठविले निवेदन
चांदूर रेल्वे – (शहेजाद खान.) 
         राज्यातील ६० वर्षावरील शेतकरी, शेतमजूर, मच्छीमार व अन्य कष्टकरी यांना दरमहा पाच हजार रुपये पेन्शन द्यावी व संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजनेचे मानधन ६०० वरून दोन हजार रुपये करण्यात यावे अशी मागणी जनता दल (से.) चे जिल्हाध्यक्ष गौरव सव्वालाखे यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी, चांदूर रेल्वे यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सोमवारी पाठविलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.
         राज्यातील नव्हे तर देशातील शेतकर्‍यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. शेती हे शेतकऱ्यांचे उपजीविकेचे एकमात्र साधन आहे. पाऊस पडो वा ना पडो शेतकऱ्यांनी शेती कधी सोडली नाही.  परंतु शेतकऱ्यांच्या मालाला बाजारात पुरेसा लाभ मिळत नाही. त्यामुळे दरवर्षी हजारो शेतकरी आत्महत्या करीत आहे. देशाचा अन्नदाता असलेल्या पोशिंद्याला वयाची ६० वर्ष पार केल्यानंतर सरकारने निवृत्त वेतन द्यावे अशी मागणी सन २०१२ पासून जनता दलाने लावून धरली आहे. अधिकारी, आमदार, खासदार, मंत्री यांना पेन्शन मिळते, परंतु शेतकर्‍यांना काहीच मिळत नाही. आज देशातील कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, गोवा, सिक्कीम, उत्तराखंड, पंजाब आदी राज्यामध्ये शेतकऱ्यांना निवृत्तिवेतन मिळत आहे. मध्य प्रदेश, दिल्ली, हरियाणा सरकारनेही घोषणा केली आहे. मग महाराष्ट्रात का नाही ? म्हणून महाराष्ट्र सरकारने ६० वर्षावरील शेतकरी, शेतमजूर, मच्छीमार व अन्य कष्टकरी यांना पाच हजार रुपये दरमहा पेन्शन द्यावी तसेच एकीकडे अधिकारी, आमदार, खासदार,  मंत्री यांच्या पेन्शनमध्ये सरकारने भरमसाठ वाढ केली आहे तर दुसरीकडे संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेअंतर्गत निराधारांना अवघे ६०० रुपये मानधन देण्यात येत असून गरिबांची ही थट्टा आहे. म्हणून या मानधनात वाढ करून ते किमान दोन हजार रुपये करावे जेणेकरून त्याचा निराधारांना आधार होईल अशी मागणी जनता दल (से.) चे जिल्हाध्यक्ष गौरव सव्वालाखे, माजी नगरसेवक मेहमद हुसेन, तालुकाध्यक्ष धर्मराज वरघट, आम आदमी पार्टीचे नितीन गवळी, संजय डगवार, डॉ. उत्तमराव पडोळे, शंकरराव आंबटकर, अंबादास हरणे, गजानन शहाडे, देविदास शेबे, सुधीर सव्वालाखे, रमेश गुल्हाने, दादाराव डोंगरे, भीमराव खलाटे, चंद्रशेखर शिरसाट, महादेवराव शेंद्रे, प्रमोद बिजवे, बबलु स्थुल आदींनी केली आहे.