लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चांदूर रेल्वे पो. स्टे.च्या ठाणेदारांची बदली नाही – दोन वर्षापासुन एकाच पोलीस स्टेशनमध्ये

0
707

मागुन आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या मात्र बदल्या

चांदूर रेल्वे तालुक्यात वाढले आहे गुन्ह्यांचे प्रमाण

चांदूर रेल्वे – (Shahejad Khan)

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमरावतीसह राज्यभरात पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहे. परंतु दोन वर्षापासुन चांदूर रेल्वे पोलीस स्टेशनचे ठाणेदार एकाच ठिकाणी असुनही त्यांच्यावर ग्रामिण पोलीस अधिक्षकांनी विशेष मेहेरबानी दाखविल्याची चर्चा आहे.

   निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार लोकसभा निवडणुका नि:पक्षपणे पार पडाव्यात यासाठी राज्यात पोलीस अधिकाऱ्यांच्या नुकत्याच बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये जे अधिकारी जास्त दिवसांपासुन एकाच पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत आहे, अशा अधिकाऱ्यांना दुसऱ्या पोलीस स्टेशनमध्ये पदस्थापना देण्यात आली आहे. परंतु चांदूर रेल्वेचे ठाणेदार १३ मार्च २०१७ पासुन चांदूर रेल्वे पोलीस स्टेशनमध्येच कार्यरत आहे. पोलीस स्टेशनचा कारभार सुरळीत राहावा यासाठी थेट मुंबईवरून ठाणेदारांची चांदूर रेल्वे शहरात नियुक्ती करण्यात आली होती. मुंबईसारख्या मोठ्या शहराचा दांगडा अनुभव असलेले ठाणेदार चांदुर रेल्वे शहरात कशाप्रकारे काम करतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले असतांना ते मात्र खरे उतरलेले नाही. २ वर्षापासुन ठाणेदारांची बदली करण्यात आलेली नसुन या लोकसभेच्यापुढे करण्यात आलेल्या बदल्यांमध्येही त्यांना एकप्रकारे मुभा देण्यात आली आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही. गेल्या दोन वर्षापासुन चांदूर रेल्वे पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुन्ह्यांमध्ये वाढ झाली असुन चांदूर रेल्वे पोलीस स्टेशनने शांततेकडून संवेदनशिलतेकडे प्रस्थान केले आहे. असे असतांनाही वरिष्ठांनी चांदूर रेल्वे पोलीस स्टेशनकडे कमालीचे दुर्लक्ष केल्यामुळे आश्चर्यच व्यक्त केल्या जात आहे. याउलट पोलीस उपनिरीक्षक यांची काही महिन्यातच बदली करण्यात आल्याचे समजते. तसेच पीएसआयची सुध्दा उचलबांगडी करण्यात आली. असे असतांना ठाणेदारांचीही या पेलीस स्टेशनमधून उचलबांगडी करून दबंग ठाणेदाराची बदली करण्याची गरज होती, जेणेकरून गुन्ह्यांचे प्रमाण कमी होईल. परंतु असे न झाल्यामुळे वरिष्ठ अधिकारी लक्ष का देत नाही असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

एसपी साहेब निवडणुकीच्या तोंडावर तरी लक्ष द्या !

ग्रामिण पोलीस अधिक्षकांच्या चांदूर रेल्वे पोलीस स्टेशनवरील दुर्लक्षामुळे चांदूर रेल्वे शहरात गुन्ह्यांचे प्रमाण वाढले असल्याची चर्चा शहरात आहे. निवडणुकीच्या तोंडावर गुन्हे कमी करण्यासाठी ठाणेदारांची बदली करणे आवश्यक होते. परंतु असे न झाल्यामुळे एसपी साहेब आता तरी चांदूर रेल्वे शहराकडे लक्ष द्या अशा मागणीचा सुर चांदूर रेल्वे शहरातुन निघत आहे.