माध्यमिक शाळांमध्ये उभारली जाणार ‘गुढी मतदानाची’ चुनावी पाठशाला : मतदानातील टक्केवारी वाढण्यासाठी अनोखा प्रयोग

0
829
Google search engine
Google search engine
चांदूर रेल्वे – (शहेजाद खान)
राज्यभरात एप्रिल महिन्यात लोकसभा निवडणूक होणार असून या निवडणुकीमधील मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून अमरावती जिल्ह्यातील प्रत्येक माध्यमिक शाळांमध्ये ‘गुढी मतदानाची’ उभारली जाणार आहे. स्वीप कार्यक्रमातील ‘चुनावी पाठशाला’ या उपक्रम अंतर्गत नोडल अधिकारी तथा माध्यमिक शिक्षणाधिकारी नीलिमा टाके यांनी मतदानातील टक्केवारी वाढावी याकरिता गुढीपाडवा या उत्सवाचे औचित्य साधून या अनोख्या उपक्रमाची आखणी केली आहे.
महाराष्ट्रात सर्वत्र गुढीपाढवा हा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो याच दरम्यान देशात ‘लोकसभा इलेक्शन २०१९–देश का महा त्यौहार’ हा राष्ट्रीय कार्यक्रम सर्वत्र होत आहे. गुढीपाडवा ६ एप्रिल रोजी असून त्या दिवशी सार्वजनिक सुट्टी असल्याने त्याचे एक दिवस अगोदर म्हणजेच शुक्रवार ५ एप्रिल  किंवा नंतरच्या कार्यालयीन दिवशी (८ एप्रिल) शाळेवर सर्वत्र गुढी मतदानाची हा उत्सव राबविल्या जाणार आहे. या दरम्यान प्रत्येक शाळेवर मातीच्या मडक्यावर निवडणूक आयोगाचे प्रतिक काढून त्याची गुढी उभारली जाणार आहे. काही शाळांमध्ये मातीचे मडके उपलब्ध न झाल्यास पांढऱ्या कापडावर सदर लोगो काढून त्याचे बाजूला जनजागृती पर फलक लावण्यात येणार आहे. तर काही शाळांमध्ये सदर लोगोंच्या पताका शालेय परिसरात लावून त्याच परिसरात रांगोळी, फुलांच्या पाकळ्या किंवा आखीव, रेखीव फलक लेखनाच्या माध्यमातून परिसरातील पालक तथा मतदारांना मतदान संदर्भात जनजागृती मोहीम राबविल्या जाणार आहे. चुनावी पाठशाला अंतर्गत या सोबतच विविध शाळांमध्ये पत्रलेखन, चित्रकला स्पर्धा,वकृत्व स्पर्धा, माहितगार व्यक्तीचे मार्गदर्शन, पथनाट्य आदी विविध स्पर्धांचे आयोजन दिनांक १८ एप्रिलपर्यंत  माध्यमिक शिक्षण विभागामार्फत केले आहे.
महा उत्सवाला सणाची जोड – शिक्षणाधिकारी नीलिमा टाके
एप्रिल महिन्यात विविध सणांसोबत थोरपुरुषांच्या जयंतीचा उत्सव आहे. इयत्ता दहावी व बारावी च्या परीक्षातून नुकतेच मुले मोकळे झाले असल्याने निश्चित त्यांचा सहभाग या उपक्रमाला लाभेल. अश्या सण उत्सवाच्या माध्यमातून मतदानाची टक्केवारी वाढेल असा आशावाद शिक्षणाधिकारी तथा नोडल अधिकारी नीलिमा टाके यांनी सांगितले.