धुऱ्याला लावलेल्या आगीमुळे बाजूच्या शेतातील ऊस व संत्रा झाडांना लागली आग – कळमगाव येथील घटना, १३ लाखांचे नुकसान

0
1264
Google search engine
Google search engine

पोलिसांनी आरोपीविरुद्ध केला गुन्हा दाखल

चांदूर रेल्वे – (शहेजाद खान ) 
चांदूर रेल्वे तालुक्यातील कळमगाव येथील एका शेतकऱ्याने स्वतःच्या शेतातील धुऱ्याला लावलेली आग त्याला चांगलीच महागात पडली आहे. या धुऱ्यातील आगीमुळे बाजुच्या शेतातील ऊस व संत्रा पिकांना आग लागली असून यामध्ये १३ लाखांचे नुकसान झाल्याची तक्रार रविवारी स्थानिक पोलिस स्टेशनला देण्यात आली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
  चांदूर रेल्वेवरून ५ कि.मी. अंतरावरील कळमगाव येथील समीर सुरेश कुलकर्णी व त्यांचे मित्र प्रशांत सुरेश कोळपकर यांचे मौजा कळमगाव शेत शिवारात २१९/३ या शेत सर्वे नंबरचे ५ एकर शेत आहे. त्या पाच एकर शेतामध्ये २०१७ मध्ये उसाचे पीक पेरले होते. त्यानंतर २०१८ च्या डिसेंबर महिन्यात खोडवा पिकाचे नियोजन करून प्रथम पीक घेतल्यानंतर ऊसाचा खोडवा हा चार महिन्याचा होता. समीर कुलकर्णी यांच्या शेताच्या धुऱ्याला लागून कळमगाव येथील सुरेश शंकरराव वाघ (४०) यांचे शेत आहे. ३१ मार्चला सकाळी ८ वाजता च्या सुमारास समीर कुळकर्णी सह गावातील सहा मजुर बाया, फवारा मारण्याकरिता २ मजूर तसेच ठिबक सिंचन दुरुस्ती करणारे दोन कारागीर व नेहमी शेतात काम करणारे गणेश वाघ असे सर्व शेतामध्ये गेले होते. शेतामध्ये काम करत असतांना त्यांना सुरेश शंकरराव वाघ याने त्याच्या शेतातील धुऱ्याला आग लावलेली दिसली. फिर्यादी समीर कुलकर्णी हे आरोपी सुरेश वाघ त्यांच्याजवळ गेले व त्यांना म्हटले की, तु धुऱ्याला लावलेल्या आगीमुळे माझ्या शेताला सुद्धा आग लागेल व माझ्या शेताचे नुकसान होईल. यावर सुरेश वाघ यांनी म्हटले की, हे माझे शेत आहे, मी माझ्या शेतात काहीही करेल. मी माझ्या शेतातील धुरा पेटवत आहे, तुम्ही मला म्हणणारे कोण असे म्हणून निघून गेले. परंतु काही वेळाने या आगीने रौद्र रूप धारण करून या धुऱ्यावरील आगीने जास्त पेट घेतल्याने समीर कुलकर्णी यांच्या शेतातील ऊसाला आग लागली. यात पाच एकरातील ऊसाच्या पिकाचे नुकसान करून ठिबक सिंचन व स्प्रिंकलरचा सेट असा एकूण १२ लाखांचे नुकसान केले. तसेच कुलकर्णी यांच्या शेताला लागूनच असलेले कळमगाव येथील सुधीर सुधाकरराव जोशी (४०) यांच्या २१९ शेत सर्वे नंबरच्या पाच एकर शेतामध्ये ५ वर्षे वयाचे संत्र्याचे झाड लागले होते. याच आगीच्या आसमुळे दोन लाईन मधील ४० ते ५० संत्र्याच्या झाडांना आग लागल्याने एक लाख रुपयांचे नुकसान झाले. आरोपी सुरेश शंकरराव वाघ याने त्याच्या शेतातील धुऱ्याला हेतूपुरस्पर आग लावल्याने आमच्या दोघांच्या शेतातील पिकांचे नुकसान झाल्याची चांदूर रेल्वे पोलीस स्टेशनला तक्रार नोंदविली. या तक्रारीवरून चांदूर रेल्वे पोलिसांनी आरोपी सुरेश शंकरराव वाघ रा.  कळमगाव याच्याविरुद्ध भारतीय दंड सहिता १८६० च्या कलम ४३५  नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार ब्रह्मदेव शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली रामेश्वर राम करीत आहे.