कर्मचाऱ्यांचे दुसरे निवडणूक प्रशिक्षण संपन्न १७१२ प्रशिक्षणार्थ्यांनी घेतले प्रशिक्षण

0
612
चांदूर रेल्वे – (शहेजाद खान ) 
वर्धा लोकसभा निवडणुकीची तयारी प्रशासनातर्फे सुरू असून कर्मचाऱ्यांना निवडणुकीचे दुसरे प्रशिक्षण स्थानिक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत १ व २ एप्रिलला आयोजित करण्यात आले होते. यामध्ये १७१२ कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षण घेतले.
वर्धा लोकसभा मतदार संघा अंतर्गत येणाऱ्या चांदूर रेल्वे – धामणगाव रेल्वे मतदारसंघातील कर्मचाऱ्यांचे निवडणूक प्रशिक्षण चांदूर रेल्वे येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत करण्यात आले होते. १ एप्रिलला कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देण्यासाठी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी उपविभागीय अधिकारी अभिजीत नाईक, चांदूर रेल्वेचे तहसीलदार राजेंद्र इंगळे, धामणगाव चे तहसीलदार भगवान कांबळे,  नांदगाव खंडेश्वरचे तहसिलदार महादेव जोरवार यांच्यासह सर्व नायब तहसीलदार यांची उपस्थिती होती. सकाळच्या सत्रामध्ये ९.३० ते १  वाजता पर्यंत आयटीआय मध्ये पीपीटी द्वारे मतदान प्रक्रिया, साहित्य अनुषंगीक बाबी चे कर्मचार्‍यांना प्रशिक्षण दिले. यानंतर दुपारच्या सत्रात स्थानिक जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये २ ते ४ आणि ४ ते ६  या दोन वेळात ईव्हीएम प्रात्यिक्षकाचे प्रशिक्षण आयोजीत करण्यात आले होते. तर २ एप्रिल ला ईव्हीएम प्रात्यक्षिक स्थळी निवडणूक निरीक्षक नागथ तबस्सुम अब्रू, निवडणूक निर्णय अधिकारी तथा वर्धेचे जिल्हाधिकारी विवेक भिमनवार व अमरावतीचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी प्रत्यक्ष भेट दिली. तसेच पाहणी करून प्रशिक्षणार्थ्यांनी सोबत संवाद साधला. प्रशिक्षणार्थींचे शंका समाधान करून त्यांनी मार्गदर्शन सुद्धा केले व निवडणूक निर्भयपणे, पारदर्शी होईल याबाबत सूचना केल्या.
महिलांसाठी ‘सखी मतदान केंद्र’
महिला चमू असलेले ‘सखी मतदान केंद्र’ प्रत्येक तालुक्यात स्थापन केले जाणार असून त्या मतदान केंद्रावर मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी तसेच पोलीस गार्ड सुद्धा महिला राहणार आहे. महिलांमध्ये जागृती तसेच आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी निवडणूक आयोगाचा हा विशेष उपक्रम आहे.