चांदूर रेल्वे मार्गावरील पोहरा जंगलात लागली आग – सात हेक्टर जळून खाक दोन तासांच्या शर्तीच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात

0
629
Google search engine
Google search engine

चांदूर रेल्वे : (शहेजाद खान )

चांदूर रेल्वे मार्गालगत असलेल्या पोहरा वर्तुळ अंतर्गत इंदला बीट वनखंड क्रमांक ७२ मध्ये रविवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत सुमारे सात हेक्टर जळून खाक झाले असून, काही शेतीक्षेत्रालाही नुकसान पोहचले आहे. दोन तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाने ही आग आटोक्यात आणली.

    सूर्य आग ओकू लागला आहे. तापमानाने ४३ अंश ओलांडत आहे. तप्त उन्हाने पशू, पक्षी देखील त्रस्त झाले असताना जंगलात अलिकडे आग लागण्याच्या घटना सातत्याने घडत आहे. रविवारी पोहरा जंगलातआग लागल्याची घटना निदर्शनास येताच सात ब्लोअरच्या साहय्याने वनकर्मचाऱ्यांना ही आग नियंत्रणात आणण्यासाठी दोन तास लागले. दुपारी हवेचा जोर अधिक असल्याने जंगलात आगीचा वेग देखील अधिक होता. त्यामुळे आग विझवताना वनकर्मचाऱ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला. पोहराचे वर्तुळ अधिकारी विनोद कोहळे यांच्या मार्गदर्शनात ही आग आटोक्यात आणल्या गेली. इंदला बीटमध्ये ही आग लावली की नैसर्गिक होती ? हे मात्र कळू शकले नाही. परंतु, वनविभागाने आगप्रकरणी अज्ञाताविरुद्ध वनगुन्हा दाखल केला आहे. वनरक्षक पी.बी.शेंडे, आर. के. खडसे, जगदिश शगोरले, बीट मतदनीस शेख रशिद, चालक राजू काकड यांच्यासह अग्निरक्षकांनी ही आग आटोक्यात आणली. याप्रकरणी वनपाल विनोद कोहळे हे तपास करीत आहेत.

वनक्षेत्रात गस्ती वाढविली

उन्हाळ्यात जंगलक्षेत्रात आग लागण्याच्या घटना घडत असल्याने वनक्षेत्रात कर्मचाऱ्यांची गस्ती वाढविली आहे. मोटरसायकलवर वनकर्मचारी गस्तीवर असले तरी वनक्षेत्रात आगीच्या घटना सातत्याने वाढत आहे. त्यामुळे जंगलातील आग नियंत्रणात आणण्यासाठी अद्यावत यंत्रणा उभारणे काळाची गरज असणार आहे. यंदा उन्हाळ्यात पोहरा, चिरोडी जंगलात तिन ते चार वेळा आगीच्या घटना घडल्या आहेत.