*वांगी येथे उपसरपंच बदलाची चर्चा : साहेबराव कणसे, सीताबाई मोहिते संधीच्या प्रतिक्षेत*: *बाबासाहेब सूर्यवंशी राजीनामा देणार का ?*

Google search engine
Google search engine

सांगली जिल्ह्यातील कडेगांव तालुक्यातील
वांगी येथील उपसरपंच बाबासाहेब सूर्यवंशी यांनी प्रभाग क्रमांक एक मधील सहकारी सदस्यांना उपसरपंचपद देण्याचा शब्द दिला आहे. त्यानुसार ते दिलेला शब्द पाळणार का ? अशी चर्चा रंगू लागली आहे.
दोन वर्षांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायत पंच वार्षिक निवडणूकीमध्ये काँग्रेसची सत्ता आली आहे. थेट सरपंच निवडीत डॉ.विजय होनमाने यांनी बाजी मारली. ग्रामपंचायतीवर काँग्रेसची एक हाती सत्ता असताना ही उपसरपंच निवडीत गटबाजी निर्माण झाली. त्यावेळी बाबासाहेब सूर्यवंशी यांनी उपसरपंचपद मिळविण्यासाठी जोरदार लॉबिंग केले. त्यावेळी राहुल साळुंखे यांनी ही उपसरपंचपद मिळवण्यासाठी मोर्चे बांधणी केली. उपसरपंचपद मिळविण्यासाठी काँग्रेसच्या दोन गटात ईर्ष्या लागल्याने सदस्यांची जुळणी करण्यासाठी इच्छुक कामाला लागले होते. उपसरपंच निवडीचा घोळ गावपातळीवर मिटत नसल्याने हा विषय नेते मंडळीच्याकडे गेला होता. सरपंच काँग्रेस पक्षाचा असल्याने नेते मंडळींनी उपसरपंच निवडीत हस्तक्षेप करण्यास नकार दिला. त्यामुळे इच्छुकांनी उपसरपंचपद मिळवण्यासाठी लागणारे सदस्य संख्या जमविण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. राहुल साळुंखे यांना शह देण्यासाठी बाबासाहेब सूर्यवंशी यांनी भाजप सदस्यांची मदत मिळवण्यासाठी प्रयत्न केले. मात्र तरीही त्यांची जुळणी झाली नसल्याने बाबासाहेब सूर्यवंशी यांनी उपसरपंच निवडीतून माघार घेतल्याने राहुल साळुंखे बिनविरोध निवड झाले होती.
राहुल साळुंखे यांची एक वर्षाची मुदत पूर्ण झाल्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर उपसरपंचपद मिळवण्यासाठी बाबासाहेब सूर्यवंशी यांनी पुन्हा इच्छुक असल्याचे सांगत पद देण्याची मागणी केली. बाबासाहेब सूर्यवंशी बिनविरोध उपसरपंच होतील अशी चर्चा सुरू असताना संजय कदम, मनिषा पाटील यांनी उपसरपंच पदासाठी दावा करण्यास सुरुवात केल्याने उपसरपंच निवड चुरशीची होईल अशी चर्चा रंगू लागली होती. बाबासाहेब सूर्यवंशी यांना पद देण्यास तीव्र विरोध होवू लागल्याने त्यांनी सदस्य पळवून सहलीला नेले. त्यावेळी त्यांनी त्यांच्या प्रभागातील सहकारी सदस्य रवींद्र ऊर्फ साहेबराव कणसे आणि सीताबाई मोहिते यांना काही महिने उपसरपंच पद देण्याचा शब्द दिला असल्याची चर्चा आहे. बाबासाहेब सूर्यवंशी यांची उपसरपंचपदी निवड होवून सहा महिन्याचा कालावधी झाला आहे. आता त्यांचा पदाचा सहा महिन्याचा कालावधी शिल्लक आहे. उर्वरित कालावधीमध्ये त्यांनी सहकारी सदस्य साहेबराव कणसे आणि सीताबाई मोहिते यांना उपसरपंचपदी काम करण्याची संधी देण्याचा शब्द दिला आहे. तो शब्द बाबासाहेब सूर्यवंशी पाळणार का? जर सहकारी सदस्यांना उपसरपंच पदाची संधी दिली नाहीतर बाबासाहेब सूर्यवंशी यांना पुढील राजकारणात प्रभागात काम करताना संघर्षाला सामोरे जावे लागेल अशी चर्चा आहे.