वर्धा लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या नेमबाज व भाजपाचे कुस्तीपटूत जोरदार टक्कर

0
764
Google search engine
Google search engine

बसपाचे शैलेश अग्रवाल व वंचित बहुजन आघाडीचे अड. धनराज वंजारींनाही चांगला प्रतिसाद

अपक्ष झित्रूजी बोरुटकर यांनी मतदारांच्या घेतल्या प्रत्यक्ष भेटी

चांदूर रेल्वे – (शहेजाद  खान)

गुरूवारी होणाऱ्या वर्धा लोकसभा मतदार संघात दोन खेळांडूमध्ये निवडणूकीचा थेट सामना रंगत आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार अ‍ॅड.चारूलता टोकस व भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार विद्यमान खासदार रामदास तडस असे हे दोन खेळाडू आहे. रामदास तडस हे प्रख्यात कुस्तीपटू असून १९६८ मध्ये तडस यांनी नागपूर केसरीचा पुरस्कार पटकाविला. १९७६, १९७८, १९८०, तसेच १९८२ नंतर सलग ४ वेळा त्यांनी कुस्तीचा विदर्भ केसरी पुरस्कार पटकाविला आहे. ते मागील १८ वर्षापासुन राज्य कुस्तीगीर परिषदेचे सल्लागार आहेत. तर काँग्रेसच्या उमेदवार अ‍ॅड. चारूलता टोकस या रायफलमध्ये राष्ट्रीय नेमबाज आहेत. १९८५ ते १९९१ या कालावधीत त्यांनी विविध राष्ट्रीय स्पर्धेत नेमबाजी केली. आशियाई क्रिडा स्पर्धेत त्यांना रौप्य पदक मिळाले आहे. १९९१ मध्ये महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती क्रिडा पुरस्कार त्यांना मिळाला आहे. अशा या दोन क्रिडा पटूंमध्ये सध्या वर्धा लोकसभा मतदार संघात चुरशीची लढत होत आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत पहेलवान असलेल्या रामदास तडस यांनी काँग्रेसचा पराभव केला होता. आता यावेळी दोन क्रिडापटूमधील लढतीत कोण बाजी मारतो. हे पाहणे महत्वाचे राहणार आहे.

 वर्धा लोकसभा मतदार संघात कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस आघाडी व भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवारात थेट लढत आहे. मात्र या लढतीत काही गावे अंत्यत निर्णयक ठरणारी आहे. याच गावावर लोकसभा निवडणुकीचा निकालही अवलंबून राहणार आहे. त्यामुळे या गावांवर आता अंतिम टप्प्यात उमेदवारांनी आपले लक्ष केंद्रीत केले आहे. यामध्ये देवळी विधानसभा मतदार संघ अंत्यत महत्वाचा की-पॉर्इंट आहे. या मतदार संघात आ. रणजीत कांबळे हे आमदार आहेत. त्यामुळे चारूलता टोकस यांच्या येथून अधिक मताधिक्य मिळवून देण्यासाठी ते कामाला लागले आहे. मात्र या मतदार संघात राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाची पूर्ण साथ कॉँग्रेसला मिळण्याची शक्यता दिसत नाही. परंतु प्रभाताईराव यांची कर्मभूमी असलेल्या या भागात जातीचाही मोठा आधार उमेदवारासाठी ‘आधार’ आहे. याशिवाय आर्वी विधानसभा मतदार संघात कॉँग्रेसचा आमदार आहे. त्यांना स्वत:ला आपण या मतदार संघात प्रबळ आहो, हे दाखविण्याची या निवडणुकीच्या निमित्ताने संधी आली आहे. त्यामुळे त्यांनी चारूलता टोकस यांचा प्रचार सुरू केला आहे. या भागात बसपा उमेदवार शैलेश अग्रवाल हे स्थानीक असल्याने ते येथे मत घेण्याची शक्यता आहे. हत्तीने मुसंडी मारल्यास कॉँग्रेसला मोठा फटका बसू शकतो, अशी स्थिती आहे. शिवाय भाजपच्या प्रचारात आर्वीत केचे, दिवे असे डबल इंजिन काम करीत आहे. त्यामुळे या मतदार संघाच्या मताधिक्यावर सर्वांची नजर आहे. २०१४ मध्ये भाजपने येथून आघाडी घेतली होती. ती आघाडी आता वाढतेय काय ? याकडे अनेकांचे लक्ष आहे. वर्धा विधानसभा मतदार संघात भाजप उमेदवाराला जातीचा फायदा सहजपणे मिळण्याची शक्यता आहे. कॉँग्रेसचा प्रचार येथे तगडा असला तरी कॉँग्रेसला या मतदार संघात बरेच पाणी तोडावे लागणार आहे. हिंगणघाट विधानसभा मतदार संघात भाजपाचे आ. समीर कुणावार यांचा दांडगा जनसंपर्क भाजपची सर्वाच मोठी जमेची बाजू आहे. नाराजांची संख्या अंत्यत कमी आहे. शिवाय राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये प्रचंड वाद आहे. शिवसेनेचे नेते अशोक शिंदे भाजपसोबत आल्याने येथे कॉँग्रेसला आघाडीची शक्यता कमी आहे. मात्र चांदूर (रेल्वे) व धामणगाव (रेल्वे) मतदार संघात काँग्रेस व भाजपाचे दोन आमदार असल्यामुळे दोन्ही पक्षांना मत विभाजन होऊ शकते. चांदूर रेल्वे येथील राष्ट्रवादीच्या निवडणुक प्रचारावरील बहिष्काराचा फटका टोकस यांना बसणार आहे. तर भाजपाची एकही मोठी सभा चांदूर रेल्वे तालुक्यात न झाल्यामुळे आता मतदारांचा कौल कोणाला राहणार हे सांगणे कठीण झाले आहे. मोर्शीमध्ये गेल्या वेळपेक्षा यावेळी भाजपची मताधिक्य वाढण्याची शक्यता आहे. सेनेची चांगली साथ भाजपला आहे. वर्धा लोकसभा मतदार संघात बसपाचे शैलेश अग्रवाल व वंचित बहुजन आघाडीचे अॅड. धनराज वंजारींची मिळणार सुध्दा मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. तर अपक्ष उमेदवार झित्रूजी बोरुटकर हे वयोवृध्द असतांनाही मतदारांच्या प्रत्यक्ष भेटी घेतांना दिसुन आले आहे. तर उर्वरीत ८ उमेदवारांपासुन मतदार अनभिज्ञ आहे.

बाई तुम्ही कोठे राहता ?

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवार अ‍ॅड. चारूलता खजानसिंग टोकस या गुडगाववरून येऊन वर्धा येथे निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहे. त्यामुळे त्यांच्या निवासस्थानाबाबत मतदार आता थेट त्यांनाच सवाल करू लागले आहे. त्या ज्या गावाला जातात. तेथे बाई तुम्ही राहता कोठे असा प्रश्न त्यांना केला जातो. त्यामुळे काँग्रेस उमेदवारांप्रती मतदारांचा तीव्र रोष दिसून येत आहे. याचा मोठा फटका काँग्रेस पक्षाला बसण्याची शक्यता आहे. माजी मंत्री व काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या प्रभा राव यांची कन्या या एकाच निकषाच्या आधारे काँग्रेसने टोकस यांना उमेदवारी दिली. ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांचा त्यांच्याशी परिचयही नाही. लग्नानंतर त्या गुडगाव येथे कायम राहण्यासाठी निघून गेल्या त्यानंतर दिवाळी, दसऱ्यालाच त्यांचे दर्शन कोल्हापूर राव व रोहणी गावातील नागरिकांना होते.

गांधींची सभा टॉप तर मोदींची सभा फ्लॉप

सुरूवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वर्धामध्ये महाराष्ट्रातील पहिली प्रचारसभा रामदास तडस यांच्यासाठी झाली. परंतु ही सभा फ्लॉप ठरल्याचे समजते. मोदींच्या भाषणाला नापसंती दर्शवित मतदारांनी मैदान सोडले होते. तर त्याच्या ३ दिवसानंतर वर्धामध्येच काँग्रेसचे राहुल गांधी यांची चारूलता टोकस यांच्या प्रचारार्थ सभा घेण्यात आली. ही सभा टॉप ठरली असुन हजारो कार्यकर्त्यांनी सभेला प्रचंड गर्दी केली होती. यावरून ग्रामिण भागातील मतदारांची भाजपाविरूध्द नाराजी पुढे आली आहे.

चार उमेदवारांचे होल्ड असलेले हे आहेत प्रमुख विभाग, गाव

रामदास तडस यांना २०१४ च्या निवडणुकीत सव्वा दोन लाखांची आघाडी मिळाली होती. सहाही विधानसभा क्षेत्रात भाजपने जोरदार मुसंडी मारली होती. कॉँग्रेसपेक्षा अधिक मताधिक्य त्यावेळी भाजपला होते. त्यामुळे भाजप ५ लाखांवर पोहचू शकला. चारूलता टोकस या पहिल्यांदाच लोकसभेच्या मैदानात आहे. त्यांच्या मताधिक्यासाठी त्यांचे मावस बंधू आ. रणजीत कांबळे यांची प्रतिष्ठापणाला लागली आहे. त्यांच्या देवळी विधानसभा मतदान क्षेत्रावर साऱ्यांच्या नजरा आहे. येथे त्यांना मताधिक्याची आशा आहे. शैलेश अग्रवाल बसपाच्या हत्तीवर स्वार झाले आहे. वर्धा जिल्ह्यात काही गावे असे आहेत की त्या ठिकाणी बसपाचे परंपरागत मतदार आहे. प्रत्येक निवडणुकीत बहुजन समाज पक्ष तेथे बाजी मारतो. यात पुलगावचाही समावेश आहे. २००९ मध्ये दत्ता मेघे निवडून आले होते. त्यांना विविध मतदारसंघांमध्ये चांगली आघाडी होती. त्यामुळे भाजपचा पराभव झाला. २०१४ मध्ये काँग्रेस पक्षाच्या आमदार असलेल्या मतदार संघात पक्षाला मते मिळाली नाहीत. त्यामुळे पराभव झाला होता. तर वंचित बहुजन आघाडीची ही क्रेझ असल्यामुळे हिंगणघाट सह इतर भागातुन अॅड. धनराज वंजारींना मते मिळण्याची शक्यता आहे.

काँग्रेस व भाजपाला जातीय समिकरणाचा फटका ?

       जातीय समिकरण पाहल्यास वर्धा लोकसभा मतदार संघात अंदाजे २२ टक्के कुणबी, २२.६ टक्के तेली, १६ टक्के हिंदि भाषीक, १४.६९ टक्के बौध्द, ५ टक्के मुस्लीम, १४ टक्के भटक्या, मागास अनुसुचित जाती – जमाती आणि उर्वरितमध्ये इतर सामाविष्ट आहे. वंचित बहुजन आघाडी व भाजपाचे उमेदवार तेली समाजाचे असल्यामुळे तेली मतांचे विभाजन नक्कीच होणार असुन याचा फटका रामदास तडस यांना बसणार आहे. धनंजय वंजारींना बौध्द व मुस्लीम समाजाचीही जास्तीत जास्त मते मिळण्याची शक्यता आहे. तर बसपाने हिंदि भाषिक उमेदवार दिल्याने बौध्द समाजासह हिंदि भाषीकांचीही व इतर शेतकऱ्यांची मते शैलेश अग्रवाल यांना मिळू शकते. या जातीय समिकरणात शैलेश अग्रवाल व धनंजय वंजारी फायद्यात राहणार असुन याचा फटका मात्र काँग्रेस व भाजपा बसु शकतो.