दैनिक सनातन प्रभातच्या गोवा आणि सिंधुदुर्ग आवृत्तीचा २० वा वर्धापनदिन सोहळा भावपूर्ण वातावरणात साजरा !

0
603

डिचोली– सनातन प्रभातने आजपर्यंत कठोरपणे आणि यशस्वीपणे लढा दिला आहे. खरे तर समुहाला प्रेरित करणे हे फार कठीण काम असते, तरीही सनातन प्रभातने हे काम यशस्वीपणे पार पाडलेले आहे. हे कार्य म्हणजे एक दैवी चमत्कार आहे, असे प्रतिपादन भारत स्वाभिमानचे श्री. कमलेश बांदेकर यांनी केले.

हिंदूंवरील अत्याचार, धर्मांधांच्या कारवाया, सामाजिक भ्रष्टाचार, शासनकर्त्यांचा पक्षपातीपणा यांसारख्या अनेक विषयांवर जागृती करणारा, ईश्‍वरी अधिष्ठान ठेवून प्रखरपणे हिंदूजागृतीचे कार्य करणारा, न डगमगता अगदी सडेतोड विचार मांडणारा आणि अनेक संतांचा आशीर्वाद लाभलेला अशी सनातन प्रभातची ख्याती आहे. आगामी आपत्काळाविषयी वाचकांना सतर्क करणे, आपत्काळाच्या तडाख्यातून वाचण्यासाठी उपाययोजना सांगणे आणि अधिकाधिक जणांचे जीवितरक्षण करणे, हीच दैनिक सनातन प्रभातच्या आगामी कार्याची दिशा आहे. अशा दैनिक सनातन प्रभातच्या गोवा आणि सिंधुदुर्ग आवृत्तीचा २० वा वर्धापनदिन सोहळा डिचोली येथील दिनदयाळ भवन येथे १४ एप्रिल या दिवशी भावपूर्ण वातावरणात पार पडला. या वेळी सोहळ्याचे प्रमुख पाहुणे या नात्याने ते उपस्थितांना मार्गदर्शन करत होते.

या सोहळ्यात शिवसेनेचे माजी गोवा राज्यप्रमुख श्री. रमेश नाईक, तसेच सनातन प्रभातचे प्रतिनिधी श्री. अरविंद पानसरे आणि हिंदु जनजागृती समितीचे दक्षिण गोवा समन्वयक श्री. सत्यविजय नाईक यांचेही मार्गदर्शन झाले. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कृतीशील पत्रकारितेची द्विदशकी वाटचाल करणार्‍या सनातन प्रभातच्या या सोहळ्याला प्रत्यक्ष उपस्थित राहून किंवा आयोजकांशी संपर्क साधून अनेकांनी शुभेच्छा दिल्या.

सोहळ्याला शंखनाद करून, तसेच सनातनचे २६ वे संत पू. सदाशिव (भाऊ) परब आणि व्यासपिठावरील अन्य मान्यवर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून प्रारंभ झाला. यानंतर व्यासपिठावरील वक्ते यांचा सत्कार आणि उपस्थित संत यांचा  सन्मान करण्यात आला. सनातन प्रभातचे डिचोली येथील साधक श्री. बाबाजी कानोळकर यांनी श्री. कमलेश बांदेकर यांचा, साखळी येथील हिंदु धर्माभिमानी श्री. दयानंद गावकर यांनी श्री. रमेश नाईक यांचा, श्री. रामचंद्र डांगी यांनी श्री. अरविंद पानसरे यांचा आणि मये येथील हिंदु धर्माभिमानी श्री. रामा गावकर यांनी श्री. सत्यविजय नाईक यांचा सत्कार केला.