फसव्या व्हाटस्अप संदेशामुळे गुन्हा दाखल करण्याचे निर्देश, नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये -जिल्हा निवडणूक अधिकारी शैलेश नवाल

0
715
Google search engine
Google search engine

मतदानासाठी मतदार यादीत नाव असणे बंधनकारकच

मतदान करण्यासाठी मतदारयादीत नाव असणे बंधनकारक आहे. असे असतानाही नागरिकांची दिशाभूल करणारा एक व्हाटसअप संदेश व्हायरल होत असून, त्याविरुद्ध आचारसंहिता कक्षाने गुन्हा दाखल करण्याचे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी शैलेश नवाल यांनी दिले आहेत.
‘मतदार यादीत नाव नसतानाही मतदान करता येते’, अशा आशयाचा संदेश सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचे निदर्शनास आले आहे. ‘मतदानाच्या दिवशी फोटो व अन्य ओळखपत्र पुरावा घेऊन मतदान केंद्रावर गेल्यास मतदान करता येते,’ अशी दिशाभूल करणारी माहिती या संदेशात आहे. ती अफवा असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
मतदान करण्यासाठी मतदार यादीत नाव असणे बंधनकारकच आहे. लोकसभा निवडणूक दि. 18 एप्रिलला असल्याने आता मतदार यादीत नाव समाविष्ट करता येणार नाही.
मतदान करण्यासाठी अन्य कागदपत्रांचा पर्याय हा केवळ मतदार यादीत नाव असलेल्यांसाठीच आयोगाने उपलब्ध करून दिला आहे. असे असतानाही अफवा पसरवून नागरिकांची दिशाभूल करणे व निवडणुकीच्या राष्ट्रीय कार्यात बाधा आणणे ही कृती गुन्हा आहे. त्यामुळे नागरिकांनी कुठल्याही अफवेवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हा निवडणूक कार्यालयाने केले आहे.
त्याचप्रमाणे, कुणीही या आशयाची अफवा फॉरवर्ड केल्यास किंवा प्रसृत केल्यास कडक कारवाई केली जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.