महामार्गाच्या  दुभाजकाचे व क्रॅश बॅरिअरचे नुकसान करणार्यावर राज्यमार्ग पोलिस करणार गुन्हे दाखल

0
672
Google search engine
Google search engine

उस्मानाबादेत महामार्गाच्या दुभाजकाचे व क्रॅश बॅरिअरचे नुकसान करणार्यावर होणार गुन्हे दाखल

उस्मानाबाद,दि.3- महाराष्ट्र राज्यामध्ये रस्ता अपघातांचे प्रमाण मागील वर्षांपेक्षा सहा टक्क्यांनी वाढले आहे.एकूण अपघातांपैकी 25 टक्के अपघात राष्ट्रीय महामार्गावर तर 23 टक्के अपघात राज्य महामार्गावर झाले आहेत. मा.सर्वोच्च न्यायालय रस्ते सुरक्षा समिती यांनी रस्ते अपघात आणि त्यामध्ये होणाऱ्या मृत्यूंमध्ये दरवर्षी दहा टक्के घट होण्याबाबतचे निर्देश दिले आहेत. वाढत्या अपघातांमध्ये रस्ते दुभाजक खंडित करून मार्ग बनविणे, हे एक प्रमुख कारण आहे.
राष्ट्रीय राज्य महामार्गावर असणारी गावे,हॉटेल्स धाबे,पेट्रोल पंप इत्यादी ठिकाणी रस्ता दुभाजक तोडून अनधिकृतपणे मार्ग तयार करण्यात आलेले आहेत.अशा अनधिकृत खंडित दुभाजकांमधून दुचाकी, चारचाकी व इतर वाहने अचानकपणे वळविण्यात येतात तसेच पादचारीही या महामार्गावरून ये-जा करतात,त्यामुळे महामार्गांवर अपघात होऊन जीवितहानी होते.
उस्मानाबाद जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्र.52 सोलापूर ते तुळजापूर या महामार्गावरील माइलस्टोन क्रमांक 42/7 माळुंब्रा शिवार,ता.तुळजापूर येथील अगत्य कृषी सेवा केंद्र या दुकानाच्या समोरील बाजूचा रस्ता दुभाजक कोणीतरी अज्ञात इसमाने तोडून मार्ग करण्यात आलेला आहे.
तरी सर्व राष्ट्रीय/राज्य महामार्गाच्या आजूबाजूला असणारे हॉटेल्स,धाबे, पेट्रोल पंप तसेच ज्यांच्याकडे जेसीबी, पोकलेन इत्यादी यंत्रसामुग्री आहे,अशा लोकांनी अशा प्रकारे दुभाजक व क्रॅश बॅरियर तोडू नयेत,असे आवाहन नळदुर्ग महामार्ग पोलीस केंद्र यांच्या वतीने करण्यात येत आहे तसेच भविष्यात या सूचनेचे कोणी उल्लंघन केल्यास त्यांच्यावर सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक कायदा 1984 कलम 3 अन्वये गुन्हा दाखल करण्यात येईल. या गुन्ह्यासाठी पाच वर्षापर्यंत ची कैद व आर्थिक दंड ही शिक्षा होऊ शकते,याचीही संबंधितांनी नोंद घ्यावी,असे महामार्ग केंद्र प्रभारी अधिकारी श्री. घंटे यांनी कळविले आहे.

*****