टंचाईग्रस्त गावांत विनाविलंब कामे व्हावीत-पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील >< जलसंधारणासाठी नदीत आडवे चर

152

संवेदनशीलता व दूरदृष्टीने कामे करावीत

प्रत्येक विभागाने आपली जबाबदारी ओळखून कामे करा

अमरावती :- पाणीटंचाई असलेल्या प्रत्येक गावात पोहोचून तेथील गरज लक्षात घेऊन तत्काळ उपाययोजना करावी. नियोजनात जून महिन्याचाही विचार होऊन तात्कालिक उपाययोजनांसह दूरदृष्टीने कामे राबवावीत, असे निर्देश पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी आज येथे दिले.

जिल्ह्यातील पाणीटंचाई व आवश्यक उपाययोजनांबाबत आढाव्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री, महापालिका आयुक्त संजय निपाणे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे एस. एस. चारथळ, सिंचन विभागाचे र. कृ. ढवळे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांच्यासह उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व विविध विभागांचे अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.

श्री. पोटे पाटील म्हणाले की, जिल्ह्यातील टंचाईबाबत आपण नऊ मार्चलाच बैठक घेऊन नियोजनपूर्वक कामे करण्याचे निर्देश दिले होते. यंत्रणेकडून थेट गावांत पोहोचून तेथील गरज लक्षात घेऊन कामे झाली पाहिजेत. जिथे विहीरी अधिग्रहित करणे, टँकर आदी आवश्यकता असेल, तिथे ती तत्काळ व्हावी. त्यासाठी सर्वांनी परस्परांशी समन्वय ठेवावा. केवळ कागदोपत्री कार्यवाहीत खोळंबून राहू नये. विनाविलंब कृती होणे आवश्यक आहे. लोकांमध्ये जा, त्यांच्याशी बोला, त्यांच्या अडचणी समजून घ्या व तत्काळ तोडगा काढा. प्रत्येक गावाच्या सरपंच, ग्रामसेवकांशी रोज संपर्क ठेवा. टंचाई निवारणासाठी एकही काम प्रलंबित राहता कामा नये, असे शासनाने यापूर्वीच निर्देश दिले आहेत. त्यामुळे तातडीने उपाय अंमलात आणा. सर्वांनी आपली जबाबदारी ओळखून कामे करा. महावितरणने वीजपुरवठ्याची कामे तातडीने करावीत.

ते पुढे म्हणाले की, केवळ तात्कालिक उपाय नकोत. त्याच्यासह जून महिन्याचाही विचार करा. पावसाळ्यात पाणी साठून राहण्यासाठी नदीत आडवे चर घेण्याचेही निर्देश त्यांनी दिले. पालकमंत्र्यांनी यावेळी प्रत्येक तालुक्याचा आढावा घेतला. रोजगार हमी योजनेतील कामांमध्ये जलसंधारणाची कामे जोरदारपणे राबविण्याचे निर्देश त्यांनी दिले. चारा उपलब्धता आदींबाबत तत्काळ कृती करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

जिल्हाधिकारी श्री. नवाल म्हणाले की, दैनंदिन परिस्थितीचा आढावा घेऊन त्यानुसार सुविधा पुरविण्यात येत आहेत. सध्या 41 गावांत टँकर सुरू आहेत. आवश्यक तिथे विहिरी अधिग्रहित केल्या आहेत. वीज देयकांसाठी सुमारे सव्वाचार कोटी रूपये निधी देण्यात आला आहे. अधिका-यांनी संवेदनशीलता दाखवून कामे करावीत. त्याच सूचना पुन्हा देण्याची वेळ येऊ नये. पाणीटंचाईचा अत्यंत महत्वाचा प्रश्न असताना संवेदनशीलतेने कामे व्हावीत.

मोर्शी तालुक्यात 44 विहिरी अधिग्रहित आहेत. आवश्यक त्या गावात 24 तासांत टँकर उपलब्ध करून देण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. वरुडमध्ये 28 गावांत विहिरी अधिग्रहित आहेत. चिखलदरा तालुक्यात 20 गावांत टँकर सुरु आहेत. आवश्यक तिथे विहिरींनजिक पाण्यासाठी टाके व नळ बसवून द्यावा. चिखलदरा- धारणी तालुक्यात विशेष प्रकल्प निधीतून ही कामे करावीत, असेही निर्देश देण्यात आले. अमरावती तालुक्यात 44 विहिरी अधिग्रहित व 3 गावांत टँकर सुरु आहेत. तिवस्यात 21 विहिरी अधिग्रहित, 2 टँकर, धामणगावमध्ये 11 विहिरी अधिग्रहित, 1 टँकर व नांदगावमध्ये 33 विहिरी अधिग्रहित आहेत. चांदूर बाजारमध्ये 2 टँकर घाटलाडकीत सुरू आहेत.

शहरात स्टँडपोस्ट, खुले नळ याठिकाणी पाणी वाया जाता कामा नये. तिथे नळ जोडण्यांसाठी प्रयत्न व्हावेत. पाणी बचतीबाबतही जागृती होणे आवश्यक आहे, असेही निर्देश यावेळी देण्यात आले

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।