(म्हणे) ‘अल्पसंख्यांंकांचा छळ झाला, आता त्यांचा विश्‍वास मिळवायचा आहे !’ – पंतप्रधान नरेंद्र मोदी

0
547
  • देशातील ८ राज्यांत हिंदू अल्पसंख्यांक झालेे आहेत. काश्मीरमध्ये हिंदू औषधालाही शिल्लक नाहीत. असे असतांना गेल्या ५ वर्षांत त्यांच्याविषयी नरेंद्र मोदी यांनी एक शब्दही उच्चारला नाही, ही वस्तूस्थिती आहे. तरीही हिंदूंनी मोदी यांना भरभरून मते दिली आणि पुन्हा विजयी केले; मात्र मोदी आता अशा प्रकारचे विधान करून ‘हिंदूंचा विश्‍वासघात करत आहेत का ?’ असा प्रश्‍न हिंदूंना पडल्यास आश्‍चर्य वाटू नये !
  • स्वातंत्र्यानंतर गेल्या ७१ वर्षांतच नव्हे, तर मोहनदास गांधी यांनी काँग्रेसची सूत्रे हातात घेतल्यापासून या देशात बहुसंख्य हिंदूंचा छळ झाला, भारताची फाळणी होऊन १० लाख हिंदूंची कत्तल झाली, काश्मीरमधून साडेचार लाख हिंदूंना पळवून लावण्यात आले, सहस्रो जणांची हत्या झाली. आजही हिंदू तेथे राहू शकत नाहीत. ईशान्य भारतात हिंदूंचे धर्मांतर होऊन तेथे हिंदू अल्पसंख्यांक झाले. असे असतांना ‘या देशात केवळ अल्पसंख्यांकांचा (मुसलमान, ख्रिस्ती आदींचा) छळ झाला’, असे विधान मोदी कसे करू शकतात ?
  • अल्पसंख्यांकांचा छळ कोणी, कधी आणि कसा केला, हे मोदी यांनी उदाहरण देऊन सांगायला हवे. गोध्रा येथे याच अल्पसंख्यांकांनी ५९ कारसेवकांना जिवंत जाळले होते, हा कोणाचा छळ होता ? देशातील अल्पसंख्यांक हे आतंकवादी कारवाया करून हिंदूंना लक्ष्य करत आहेत, हा हिंदूंचा छळ नाही का ?
  • गेली ७१ वर्षे अल्पसंख्यांकांचा विश्‍वास संपादन करण्यासाठी भारतीय शासनकर्ते गांधीगिरी करत आले आहेत. त्या मोबदल्यात हिंसाचाराविना त्यांच्या पदरात काहीही पडलेले नाही, हे मोदी यांना ठाऊक नाही का ? मुळात मोदी यांनी पाकिस्तान आणि बांगलादेश येथील अल्पसंख्यांक हिंदूंचा छळ होत आहे, त्याकडे लक्ष द्यायला हवे !

नवी देहली – देशात ज्या पद्धतीने गरीब जनतेचा छळ केला गेला, त्याच पद्धतीने अल्पसंख्यांकांचाही (मुसलमानांचा) छळ झाला. त्यांना भीती दाखवली गेली. अल्पसंख्यांकांचा नेहमीच मतपेढी म्हणून वापर झाला. त्यांची गळचेपी केली गेली. त्यांच्या शिक्षणाचा, तसेच आरोग्याचा विचार केला गेला नाही. (देशात मुसलमानांच्या शिक्षणाचा आणि आरोग्याचा विचार करण्यात आला होता; मात्र मदरशांतील शिक्षणापासून त्यांना बाहेरच पडायचे नाही, हीच वस्तूस्थिती आहे, तसेच पोलिओसारखी औषधे इस्लामविरोधी असल्याचे सांगत ते घेण्यासही ते नकार देतात ! असे असतांना प्रशासन काय करणार ? – संपादक) वर्ष २०१९ मध्ये आपल्याला यास छेद द्यायचा आहे. आपल्याला अल्पसंख्यांकांचा विश्‍वास संपादन करायचा आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान मोदी यांनी २५ मे या दिवशी भाजपच्या आघाडीचे नवनिर्वाचित खासदार आणि प्रमुख नेते यांच्या संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत केले. ‘सबका साथ, सबका विकास’ हाच आपला मंत्र आहे’, असेही ते म्हणाले.

मोदी पुढे म्हणाले की, सुराज्यासाठी आणि गरिबी मुक्तीसाठी लढायचे आहे. मत देणारे आणि विरोध करणारेही आपलेच आहेत. विकासयात्रेत कोणीही मागे रहाणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. वर्ष २०१४ ते २०१९ या कालावधीत आम्ही गरिबांसाठी सरकार चालवले. वर्ष २०१९ मध्ये या देशातील गरिबांनीच हे सरकार बनवले.

विशेष आभार – दैनिक सनातन प्रभात -वृत्तसंकेतस्थळ