विहिर खोलीकरण करतांना क्रेनचा तार तुटुन दोन मजुरांचा मृत्यू एक जण गंभीर; आमला (विश्वेश्वर) जवळील घटना

0
624
Google search engine
Google search engine

चांदूर रेल्वे – (शहेजाद  खान) 

         चांदूर रेल्वे तालुक्यातील आमला (विश्वेश्वर) ते पाथरगाव रोडवर असणाऱ्या एका शेत शिवारात विहीर खोलीकरणचे काम सुरू असतांना अचानक क्रेनचा रॉड तुटल्याने यात एका मजुराचा जागीच तर एकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असून एक मजूर गंभीररित्या जखमी झाले आहे. ही घटना रविवारी (ता. २६) सकाळी ११.३० वाजताच्या दरम्यान घडली.

           उमेश नारायन काळे वय (२२) व विनोद सिताराम राठोड (वय ४२) दोघेही रा. साखरा ता. दिग्रस जि. यवतमाळ असे मृतक मजुरांचे नाव असून संतोष चव्हाण असे गंभीर जखमीचे नाव आहे. या जखमीवर अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे. प्राप्त माहितीनुसार राजेंद्र मारोतराव डंबारे रा.आमला विश्वेश्वर यांच्या शेतातील विहीर खोलीकरणाचे काम मजुरांच्या सहाय्याने सुरू होते व निघालेला मलमा डिसेल क्रेनच्या मदतीने बाहेर काढण्यात येत होता. यात रविवारी सकाळी काही मजूर विहीरीत आधीच उतरले होते. तर क्रेनच्या सहाय्याने तिन जण विहिरीत उतरत असतांना अचानकपणे क्रेनचा रॉड तुटला असता यात क्रेन मधून उमेश काळे हा थेट विहिरीत पडला त्याला जबर मार लागल्याने त्याचा घटनास्थळी विहिरीत पडून मृत्यू झाला तर यात इतर दोन मजुरांनी रॉड तुटल्याबरोबर उड्या मारल्याने ते गंभीर जखमी झाले होते. दोघांनाही अमरावती येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात भरती करण्यात आले होते. उपचारादरम्याम विनोद राठोड याचा मृत्यु झाला असुन संतोष चव्हाण वर उपचार सुरू आहे. उमेश काळे याचे चांदूर रेल्वे ग्रामिण रूग्णालयात तर विनोद राठोड वर अमरावती येथे शवविच्छेदन करण्यात आले. सदर विहीर ११० फूट खोल होती. कुऱ्हा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला असून गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.