माजी राष्‍ट्रपती प्रतिभा देविसिंह पाटील यांना मेक्सिको सरकारचा राष्‍ट्रीय पुरस्‍कार जाहीर

0
840

पुणे – -देशाच्‍या माजी राष्‍ट्रपती प्रतिभा देविसिंह पाटील यांना मेक्सिको सरकारचा प्रतिष्‍ठेचा ऑर्डन मेक्सिकाना डी अॅग्‍यूइला ऍझटेका हा राष्‍ट्रीय पुरस्‍कार जाहीर झाला असून येत्‍या शनिवारी 1 जून रोजी पुण्‍यामध्‍ये सन्‍मानपूर्वक प्रदान करण्‍यात येणार आहे. सेनापती बापट रस्‍त्‍यावरील मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स इंडस्‍ट्रीजच्‍या पाचव्‍या मजल्‍यावरील सभागृहात हा कार्यक्रम सकाळी 11.30 वाजता होणार आहे. मेक्सिकोच्‍या राजदूत या वेळी प्रमुख पाहुण्‍या म्‍हणून उपस्थित राहणार आहेत. मेक्सिको देशाशी मानवतावादी परस्‍पर संबंध दृढ करणा-या परदेशी नागरिकाला हा सन्मान प्रदान करण्‍यात येतो. यापूर्वी डॉ. नेल्‍सन मंडेला,राणी एलिझाबेथ (द्वितीय), डॉ. सर्वपल्‍ली राधाकृष्‍णन, बिल गेट्स या मान्‍यवरांना या पुरस्‍काराने गौरवण्‍यात आले आहे. देशाच्‍या राष्‍ट्रपती असतांना सन 2007मध्‍ये मेक्सिकोचे राष्‍ट्राध्‍यक्ष फेलिपी डी जेझस कॉल्‍डेरॉन हिनोजोसा यांनी भारताला भेट दिली होती.त्‍यांच्‍या निमंत्रणावरुन श्रीमती पाटील यांनी  2008 मध्‍ये मेक्सिकोला भेट दिली होती. या काळात दोन्‍ही देशांदरम्‍यान असलेले संबंध अधिक बळकट झाले होते.