पाथरगाव येथील क्रेन तुटल्याच्या प्रकरणात चालक व मालकावर गुन्हे दाखल – दोन्ही आरोपींना अद्यापपर्यंत अटक नाही

0
1332
Google search engine
Google search engine
चांदूर रेल्वे – (शेहजाद खान)
चांदूर रेल्वे तालुक्यातील पाथरगाव शेतशिवारात क्रेन मशिनचे लोखंडी बार तुटुन झालेल्या अपघात प्रकरणी कुऱ्हा पोलीसांनी क्रेनचालक व क्रेनमालकाविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
आमला (विश्वेश्वर) येथील राजेंद्र मारोतराव डंबारे यांच्या शेतामधील विहीरीचे खोलीकरण मजुरांच्या मदतीने सुरू असतांना त्यातील मलमा डिसेल क्रेनच्या मदतीने बाहेर काढण्यात येत होता. अशातच २३ मे रोजी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास क्रेनच्या सहाय्याने तिन मजुर विहिरीत उतरत असतांना अचानकपणे क्रेनचा लोखंडी बार तुटुन यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यातील साखरा येथील उमेश नारायन काळे यांचा जागीच व विनोद सिताराम राठोड यांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला होता. तर संतोष चव्हाण हा मजुर गंभीर जखमी असुन त्याच्यावर जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचार सुरू होते. सदर प्रकरणात सुरूवातीला कुऱ्हा पोलीसांनी मर्गचा गुन्हा नोंदविला होता. त्यानंतर आता रोहिदास चरण चव्हाण (कंत्राटदार, क्रेनमालक) व नामदेव गणपत आडे (क्रेनचालक) दोन्ही रा. साखरा ता. दिग्रस जि. यवतमाळ यांच्याविरूध्द भादंविचे कलम ३०४ अ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना अद्यापपर्यंत अटक करण्यात आलेली नाही. प्रकरणाचा पुढील तपास कुऱ्हा पोलीस स्टेशनचे एएसआय साबळे करीत आहे.
 
चालक – मालक कारणीभुत असल्याचा ठपका
दोन्ही आरोपींनी जुनाट क्रेन वापरली. मजुरांसाठी सुरक्षेचे साहित्य बाळगले नाही, तर चालक नामदेव आडे याने क्रेनचे ब्रेक अचानक लावल्यामुळे तीनही मजुर क्रेनच्या टपामधून विहीरीत कोसळले. यामध्ये दोघांचा मृत्यु व एका मजुराच्या जखमी होण्यास चालक – मालक कारणीभुत असल्याचा ठपका तक्रारीतुन ठेवण्यात आला आहे. विहीर खोलीकरणा दरम्यान हा अपघात घडला होता.