Google search engine
Google search engine
पाण्याच्या राजकारणासाठी असाही प्रताप 
चांदूर रेल्वे – (शहेजाद खान) 
चांदूर रेल्वे शहरात भिषण पाण्याची टंचाई निर्माण झाली असुन जिकडेतिकडे पाण्यासाठी हाहाकार माजत आहे. यासाठी जिल्हा प्रशासन तत्पर असुन वेळोवेळी टँकरचा पुरवठा करीत आहे. मात्र या पाण्यावरही आता राजकीय गालबोल लागले आहे. प्रशासनाच्या टँकरवर चक्क स्थानिक काँग्रेसच्या आमदारांचे अथक परिश्रमाचे पोस्टर लागले असुन याविषयी भाजपा नगरसेविका सौ. सुरेखा विलास तांडेकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सोमवारी तक्रार देऊन संबंधितांवर तत्काळ कारवाईची मागणी केली आहे. या तक्रारीमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
चांदूर रेल्वे शहरात सध्या पाण्याची तीव्र टंचाई आहे. नियोजनशून्य चांदूर रेल्वे नगर परिषदेच्या कारभारामुळे नागरिकांना प्रचंड पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. त्यामध्ये टँकरने पाणीपुरवठा चालू आहे. कमी-अधिक प्रमाणात पाणी नागरिकांना मिळत आहे. मात्र शहरांमध्ये पाण्यावरून भांडणेही वाढली आहे. त्यातच अमरावतीच्या प्रशासनातर्फे शहराला काही पाण्याचे टँकर दिले. मात्र त्या टँकरवर चांदूर रेल्वे येथील काँग्रेसचे आमदार यांनी स्वत:च्या नावाचे टँकरसाठी अथक परिश्रम केल्याचे बॅनर लावून टँकरचे श्रेय घेण्यासाठी स्वतःचे राजकारण करीत असल्याचा आरोप सुरेखा तांडेकर यांनी केला. त्यामुळे शहरातील लोकांना पाण्याच्या राजकारणावरूनअशा वेळेस काँग्रेसच्या आमदारांच्या घृणास्पद कृत्याची चीड निर्माण होत आहे. प्रशासनाच्या निधीतून टँकरवर स्वतःचे नाव लावणे लज्जास्पद बाब असुन या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर तत्काळ कारवाई करावी अशी मागणी भाजपा नगरसेविका सौ. सुरेखा विलास तांडेकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना तक्रार देऊन केली आहे. व टँकरवर स्वत:च्या नावाचे आमदारांनी बॅनर कसे लावले याचे स्पष्टीकरण त्यांनी प्रशासनाला मागितले आहे. या प्रकरणामुळे शहरात अनेक चर्चांना उधान आले आहे.

तर पोस्टरबाजी करण्याची गरज भासली नसती – सौ. तांडेकर 
मुख्यमंत्री व पालकमंत्री यांच्या अथक परिश्रमाने अमरावतीच्या प्रशासनामार्फत जिल्ह्यात टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. मागिलवर्षी पाणीटंचाई असतांना वरूड बगाजी धरणावरून शहराला पाणी पुरवठा करण्याचा नगर परिषदेला प्रस्ताव सुचविले होते. तेव्हा यावरच विशेष प्रयत्न केले असते तर आज राजकीय हेतुपोटी पोस्टरबाजी करण्याची गरज काँग्रेसच्या आमदारांना भासली नसती असे तडकफडक मत भाजपाच्या नगरसेविका सौ. सुरेखा विलास तांडेकर यांनी व्यक्त केले.

टँकरकरीता आमदारांची आर्थिक मदत – गोटू गायकवाड
सदर टँकरसाठी आमदार जगताप यांनी विशेष प्रयत्न केले आहे. स्थानिक नगर परिषदमध्ये सत्ता काँग्रेसची असुन नगराध्यक्ष सुध्दा काँग्रेसचाच आहे. म्हणुन काँग्रेसचेच आमदार ह्या नात्याने नगर परिषदेवर आर्थिक भुर्दंड न पडु देता स्वत:च्या जवळून सुध्दा आर्थिक मदत याकरीता देत आहे. त्यामुळे टँकरवर आमदारांच्या नावाचे पोस्टर लागले असुन यामध्ये राजकारणाचा कुठलाही भाग नसल्याचे मत काँग्रेस गटनेता गोटू उर्फ वैभव गायकवाड यांनी व्यक्त केले.

मुख्याधिकाऱ्यांची प्रतिक्रीया देण्यास टाळाटाळ 
सदर प्रकरण प्रशासनाशी सुध्दा निगडीत असतांना मुख्याधिकारी यांनी स्वत: प्रतिक्रीया देण्यास टाळाटाळ करून दुसऱ्यांच्या प्रतिक्रीया घेण्याचा मोफत सल्ला दिला. आमच्यातर्फे बॅनर लावल्या गेले नाही केवळ असे म्हणुन पुढे बोलण्यास नकार दिला. त्यामुळे स्पष्ट ठोस माहिती मुख्याधिकाऱ्यांकडून न सांगितल्यामुळे पाणी कुठे मुरतंय ?  याचा शोध घेणे महत्वाचे आहे.

हे तर अशोभनीय कृत्य – श्री निलेश विश्वकर्मा 
विधानसभा निवडणुका जवळ आल्या आहे. ज्यांचा पिंड राजकारण आहे ते राजकारण करणारचं. परंतु खरी गरज असतांना थंड हवेच्या ठिकाणी फिरायला जाणे आणि आता पावसाळा सुरू होत असतांना मात्र पाण्याचे राजकारण करणे हे अशोभनीय कृत्य असल्याचे मत जयहिंद क्रीडा मंडळाचे अध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांनी व्यक्त केले.