वृक्षवल्लींच्या साक्षीने डॉ अंकित – कल्याणीचे विवाहबंधन

0
1099
Google search engine
Google search engine
औचित्य जागतिक पर्यावरण दिनाचे :वधुपितातर्फे वऱ्हाडींना १५०० फळरोपांचे वाटप 
चांदूर रेल्वे – (शहेजाद खान) 
वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे । पक्षिणी सुस्वरे आळविती’ या संत तुकारामाच्या अभंगात निसर्गाचे सार दडलेले आहे. आज पर्यावरणकडे झालेल्या दुर्लक्षामुळे जागतिक तापमानात वाढ झालेली आहे. वनविभागात सेवेत असलेल्या वधुपित्याने पर्यावरणाची आजची खरी गरज ओळखून आपल्या लाडक्या लेकीच्या लग्नात वऱ्हाडींना १५०० फळरोपांचे वाटप केले. अमरावती येथील तेलाई सेलिब्रेशन लॉन येथे वर डॉ. अंकित काळे व वधू कल्याणी कविठकर हे बुधवारी सकाळी ११ वाजता जागतिक पर्यावरण दिनाच्या औचित्यावर वृक्षवल्लीच्या साक्षीने विवाहबंधनात अडकले आहेत.
शासन सध्या ३३ कोटी वृक्षारोपण मोहीम राबवत आहे. वधूपिता अशोक वामनराव कविठकर हे अमरावती येथे सहा वनसरंक्षक या पदावर सेवेत असून त्यांनी यापूर्वी कारंजा येथे १०० हेक्टर जागेत व मोर्शी येथे २७०० हेक्टर जागेत बॉटनीकल गार्डन आणि शहरात ऑक्सिजन पार्क उभारण्यात महत्वाची भूमिका निभावली आहे. श्री कविठकर यांची मुलगी कल्याणी ही एम एस सी- बॉटनी (वनस्पतीशास्त्र) झाली असून मुलगा अंकित काळे हा बायोटेक्नॉलॉजी विषयात डॉक्टरेट झाला आहे. बुधवारी संपन्न झालेल्या या विवाहात अक्षदसाठी सुद्धा प्लास्टिक पिशवीचा वापर न करता पारंपारिक पद्धतीने अक्षद वाटप झाले आहे. तसेच या विवाह दरम्यान वर-वधू पक्षातर्फे कुठल्याही प्रकारचे फटाके न फोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे फटाक्यांचा आवाज कुठेही आढळून आला नाही.
सध्या सर्वत्र ४५ अंशापेक्षा अधिक तापमान आहे भविष्यात हे तापमान कमी व्हावे त्याकरिता वृक्षारोपण व जलसंवर्धन हा महत्वाचा मार्ग आहे. त्यामुळे या विवाहमध्ये एकूण १५०० फळरोपांचे वऱ्हाडीना वितरण झाले असून यामध्ये जांब-११००, आंबा-१००, सीताफळ-१००, आवळा-२०० चे वितरण केले. फळरोप सहज घरातील परिसरात लावल्या जाईल व भविष्यात त्या वृक्षाच्या रुपाने या विवाहातील आठवणी व ऋणानुबंध कायम राहतील असा आशावाद श्री. कविठकर यांनी व्यक्त केला. 
पर्यावरणपूरक विवाह सोहळा – आज ग्लोबल वार्मिंगचे प्रमाण खूप वाढलेले आहे. आपल्या शिक्षणाचा उपयोग प्रत्यक्ष सामाजिक कार्यासाठी व्हावा म्हणून विवाह च्या माध्यमातून जागतिक पर्यावरण दिनावर विवाहाचा निर्णय घेतला.वृक्षारोपण तथा पर्यावरणपूरक विवाहच्या माध्यमातून समाजाला निरोगी आयुष्य प्राप्त व्हावं हाच यामागील उद्देश असल्याचा वर डॉ. अंकित काळे यांनी सांगितले.