चांदूर रेल्वे तालुक्यात वाऱ्यासह पाऊस, उकाड्याने हैरान नागरिकांना दिलासा – शहरातील ४ तास विज पुरवठा बंद

0
569
Google search engine
Google search engine

चांदूर रेल्वे : (shahejad Khan) 

मंगळवारी संध्याकाळी चांदूर रेल्वे शहरात आणि लगतच्या भागात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. ऐन वेळी पावसाच्या हजेरीने दुचाकीस्वारांची तारांबळ उडाली होती. गेल्या अडीच महिन्यांपासून होरपळून काढणाऱ्या उन्हापासून चांदूर रेल्वे तालुकावासीयांना मंगळवारी दिलासा मिळाला. दुपारी चार नंतर वातावरण बदलले. शहरात वादळी वारा सुटला होता. काही ठिकाणी पावसाच्या सरींचा शिडकावा झाला. यामध्ये नुकसान सुध्दा झाल्याची माहिती समोर येत आहे.

सध्या तापमानाचा पारा वाढला आहे. उष्णतेने अंगाची काहीली होत आहे. मात्र, मंगळवारी सायंकाळी ४ च्या सुमारास चांदूर रेल्वे सह राजना, सोनगाव, कळमगाव, कळमजापुर भागात अचानक जोरदार पाऊस पडल्याने वातावरणात थोडासा गारवा आला. त्यामुळे तालुक्यातील तापमानात थोडी घट झाली. पाऊस पडत असतांना वाऱ्याचा वेग जास्त होता. वादळी  वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाल्याने शहरात अनेकांची तारांबळ झालेली पाहायला मिळाली. सोनगाव, कळमगाव, कळमजापुर परिसरात जोरदार वाऱ्यामुळे अनेक झाडे पडली तसेच पोल सुध्दा पडल्याचे समजते. सोनगाव परिसरात थोड्या प्रमाणात गारपीट झाल्याची माहिती काही गावकऱ्यांनी दिली. त्यामुळे पहिल्याच पावसाने तालुक्यात काही प्रमाणात नुकसान झाले आहे. घुईखेड परिसरात वादळी वाऱ्यामुळे अनेक तासापर्यंत रात्री विद्युत पुरवठा बंद होता. हवामान खात्याने १२ जुनदरम्यान पाणी येण्याची शक्यता वर्तविली होती. परंतु तालुक्यात पावसाचे आगमन त्यापुर्वीच झाले असुन उकाड्याने हैरान नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

शहरातील ४ तास विज पुरवठा बंद

मंगळवारी सायंकाळी आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे चांदूर रेल्वे शहरासह तालुक्यातील काही भागात विज पुरवठा जवळपास ४ – ५ तास बंद होता. लवकरात लवकर विज पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी विज वितरण कंपनीचे शहरातील अभियंता चौधरी यांनी आपल्या टिमसह अथक परिश्रम घेऊन विद्युत पुरवठा सुरू केला.