प्रशासनाच्या टँकरला आ. जगतापांचे आर्थिक पाठबळ – नगर परिषदेत पाणी टंचाईविषयी पत्रकार परिषद

0
1273
पाणी टंचाईसाठी भविष्यातील उपाययोजनाबाबत झाली चर्चा 
चांदूर रेल्वे – (शहेजाद खान) 
मागिल २२ वर्षानंतर प्रथमच चांदूर रेल्वे शहराला पाणी टंचाईची झळ पोहचली असुन शहरात ७ टँकरने पाणीपुरवठा सुरू असुन पुन्हा ३ टँकरची आवश्यकता आहे. तसेच प्रशासनाच्या सुरू असलेल्या टँकरला माझी वैयक्तीक आर्थिक मदत असल्याचे मत आमदार प्रा. वीरेंद्र जगताप यांनी व्यक्त केले. स्थानिक नगर परिषदच्या हॉलमध्ये गुरूवारी सायंकाळी पाणी टंचाईविषयी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पाणी टंचाईसाठी भविष्यातील उपाययोजना बाबत चर्चा झाली.
चांदूर रेल्वे शहराला पाणी पुरवठा होणाऱ्या मालखेड तलावात केवळ मृतसाठा उपलब्ध असुन तलाव पुर्णत: कोरडे पडले आहे. यामुळे चांदूर रेल्वे शहरात पाणी टंचाईची स्थिती निर्माण झाली आहे. याविषयी नगर परिषद हॉलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेला आ. वीरेंद्र जगताप यांच्यासह नगराध्यक्ष शिट्टु उर्फ निलेश सुर्यवंशी, उपाध्यक्ष देवानंद खुने, पाणी पुरवठा सभापती महेश कलावटे यांची उपस्थिती हे़ोती. यावेळी बोलतांना आ. जगताप म्हणाले की, शहरात पाणीटंचाई स्थिती असतांना मी जिल्हाधिकारी यांच्याकडे उन्हाळ्याच्या सूरूवातीलाच टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी केली होती. परंतु जिल्हाधिकारी यांनी चांदूर रेल्वे शहराची लोकसंख्या २० हजार असुन तलावातील पाणी शहरासाठी पुरेसे असल्याचे सांगितले. मात्र त्यानंतर मी जिल्हाधिकाऱ्यांना लोकसंख्येचे गणित पटवुन दिले. यामध्ये शहराची लोकसंख्या २० हजार असुन चांदूर रेल्वे शहरात राहणारे मात्र बाहेरगावी मतदान असणाऱ्यांची संख्या अंदाजे ५ हजार आहे. याशिवाय जनगणनेनंतर आता ५ हजार लोकसंख्या पुन्हा वाढली असुन शहरात येणाऱ्या जाणाऱ्यांची संख्या सुध्दा जवळपास ५ हजार आहे. अशी लोकसंख्या ३५ हजार झाली आहे व जनावारांसाठी सुध्दा पाण्याची आवश्यकता आहे. हे सर्व जिल्हाधिकारी यांना समजावुन सांगितल्यानंतर जिल्हाधिकारी प्रत्येकी ५ हजार लिटरचे ५ टँकर देण्यास तयार झाले. परंतु यामध्ये सुध्दा आर्थिक अट ठेवली होती. प्रत्येक टँकरला दिवसा २ हजारांचा खर्च असुन त्यामधील ११०० रूपये पर्यंतच प्रशासन अदा करू शकणार असल्याचे सांगितले. उर्वरीत ९०० रूपये नगर परिषद देऊ शकत नव्हती. त्यामुळे ही उर्वरीत मदत मी वैयक्तीकरित्या देणार असल्याचे आ. वीरेंद्र जगताप यांनी यावेळी सांगितले. याशिवाय नगर परिषदेच्या मालकीचे २ टँकर असुन ते नाविण्यपुर्ण योजनेतुन मिळविले तर पुन्हा ३ टँकरची चांदूर रेल्वे शहराला आवश्यकता असल्याचेही त्यांनी म्हटले. तसेच आर्थिक मदस दिली असल्यामुळे टँकरवर बॅनर लावले असुन ते चुकीचे नसल्याचेही जगताप यांनी सांगितले. यावेळी नगरसेवक सतपाल वरठे, प्रफुल्ल कोकाटे, कल्पना लांजेवार, शारदा मेश्राम, शुभांगी वानरे, स्वाती माकोडे, शबाना परवीन हमीद कुरैशी, बंटी माकोडे, अविनाश वानरे, राजु लांजेवार, प्रवण भेंडे, शेख अंबीरभाई, रूपेश पुडके, संदिप शेंडे, दिक्षांत पाटील, समेध सरदार आदींची उपस्थिती होती.
दररोज ४०-४५ टँकरचे पाणी वाटप – नगराध्यक्ष शिट्टु सुर्यवंशी
चांदूर रेल्वे शहराला ७ टँकरने उर्दु शाळेतील व पंचायत समिती परिसरातील विहिरीतुन पाणी घेऊन शहराला पाणी पुरवठा सुरू आहे. दररोज ४५-५० टँकरने पाणीपुरवठा सुरू असुन जवळपास २.५० लाख लीटर पाणी शहरवासीयांना वाटत असल्याचे नगराध्यक्ष शिट्टु उर्फ निलेश सुर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेदरम्यान सांगितले.
दर ४ दिवसाने टँकरने पाणीपुरवठा – महेश कलावटे
      चांदूर रेल्वे शहरात ७ ते ८ दिवसातुन एक वेळा नळ सोडत असुन नळ सोडल्याच्या दर ४ दिवसाने टँकरने पाणीपुरवठा नगर परिषदतर्फे सुरू आहे. शहरवासीयांच्या पाणी समस्येसाठी नगर परिषद प्रयत्नशील असल्याचे पाणी पुरवठा सभापती महेश कलावटे यांनी यावेळी म्हटले.