चांदूर रेल्वे शहरात प्लास्टिक बंदीचा फज्जा न. प. मुख्याधिकाऱ्यांचे अक्षम्य दुर्लक्ष

0
585
Google search engine
Google search engine

चांदूर रेल्वे – (Shahejad Khan)

पर्यावरणाला घातक असलेल्या प्लास्टिक व थर्माकोलवर राज्य सरकारने बंदी घातली आहे. या बंदीचे सर्वत्र स्वागत होत असतानाच मात्र चांदूर रेल्वे शहरात या प्लास्टिकबंदीचा पूर्णत: बोजवारा उडाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. शहरी भागासह ग्रामीण भागातही या योजनेचा फज्जा उडाला असून, बंदीचा केवळ फार्सच उरला आहे. त्यामुळे मुख्याधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे बोलल्या जात आहे.

राज्यात संपूर्ण प्लास्टिक बंदीचा आदेश राज्य सरकारने काढला. या बंदी आदेशाचे पालन न करणार्‍यांना ५ हजार रुपये दंडाची शिक्षा होऊ शकेल, अशी तरतूद अध्यादेशात करण्यात आली. सुरुवातीच्या काही दिवसात या बंदीची राज्यभर कडक अंमलबजावणी झाली. शहरी भागात या बंदीच्या अंमलबजावणीची जबाबदारी नगरपालिका यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. चांदूर रेल्वे शहरात सरसकट प्लास्टिकच्या वस्तूंचा वापर खुलेआम सुरू केला आहे. सध्या सर्वच दुकानात प्लास्टिक बॅगचा वापर सर्रास सुरू आहे. लग्न-समारंभांसारख्या कार्यक्रमात प्लास्टिक पत्रावळी, पेला, वाटी, चमचे यांचा वापर बंदीनंतरही सुरूच आहे. प्लास्टिक बंदीचा निर्णय चांगला असला, तरी त्याच्या अंमलबजावणीत काटेकोरपणा नसल्याने इतर वस्तूंच्या बंदीप्रमाणेच याही बंदीचा संपूर्णपणे फज्जा उडाल्याचे आज तरी वास्तव चित्र दिसत आहे. यापुर्वीचे मुख्याधिकारी दारोकार यांनी प्लास्टीक बंदीसाठी अनेकवेळा मोहीम राबविली होती. परंतु नवीन महिला मुख्याधिकारी यांचे याकडे दुर्लक्ष होत असुन व्यापाऱ्यांना प्लास्टीक वस्तु विकण्यासाठी एकप्रकारे मुक संमंतीच दिली तर नाही ना ? या वर अनेक तर्क वितर्क शहरात लावल्या जात आहे.

बंदी नसलेले घटक 

50 मायक्रॉनपेक्षा जास्त जाडीच्या वस्तू, 200 मि.लि.पेक्षा जास्त द्रवधारण क्षमता असलेल्या बाटल्या, दुधाच्या पॅकिंगसाठी वापरण्यात येणार्‍या 50 मायक्रॉनपेक्षा जास्त जाडीच्या पिशव्या, औषधाचे वेष्टन, वैद्यकीय उपकरणे, उत्पादनांसाठी वापरण्यात येणारे प्ला
स्टिक आदी.

…यावर आहे बंदी 

सर्वप्रकारच्या प्लास्टिक पिशव्या, प्लास्टिक व थर्माकोलचे सजावट साहित्य, प्लास्टिक ताट, ग्लास, प्लेटस्, चमचे, कप, वाटी, भांडी, हॉटेलमधील अन्नपदार्थ पॅकिंगसाठी वापरण्यात येणारी भांडी व वाटी आदी.