घुईखेड – (Shahejad Khan)
म्हैश चरतांना बाजुला असलेल्या नदीत गेली असता नदीतुन म्हैस हाकलुन परत बाहेर आणतांना एका ७५ वर्षीय वृध्दाचा मृत्यु झाल्याची दुख:द घटना चांदूर रेल्वे तालुक्यातील घुईखेड येथे गुरूवारी (ता. २०) दुपारी २ वाजताच्या दरम्यान घडली.
प्राप्तमाहितीनुसार, घुईखेड येथील शंकर दशरथ वाघाडे (७५) हे आपल्या घराच्या म्हशी गावालगतच्या चंद्रभागा नदी व खोलाड नदीच्या मधातील भागात चरण्यासाठी बुधवारी सकाळी ११ वाजता घेऊन गेले होते. म्हैश चरता चरता नदीत गेली असता म्हशीला परत आणण्यासाठी शंकर वाघाडे सुध्दा नदीत गेले असता ते नदीतील गाळात फसले. व पाण्यात बुडाले. बुधवारी घरच्यांनी शोधा शोध केल्यानंतरही त्यांचा कुठेही पत्ता लागला नव्हता. तळेगाव दशासर पोलीस स्टेशनला सुध्दा हरविल्याची तक्रार देण्यात आली होती. नदीकडे म्हैस घेऊन गेल्याने नदीत फसल्याचा अंदाज व्यक्त केला होता. व बुधवारी रात्री नदीमध्ये शोधकार्य सुरू झाले. चांदूर रेल्वे न. प. च्या अग्नीशमच्या चमुंना पाचारण करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत ते पाण्यात आढळून आले नव्हते. त्यानंतर गुरूवारी पुन्हा ती चमु व काही गावकऱ्यांनी नाव घेऊन सकाळपासुन शोधण्यास सुरूवात केली. गुरूवारी २ वाजताच्या सुमारास गाळात अडकलेला शंकर वाघाडे यांचा मृतदेह आढळला. मृतदेह शवविच्छेदनाकरीता चांदूर रेल्वे येथील ग्रामिण रूग्णालयात आणण्यात आले. सायंकाळी शवविच्छेदन झाल्यानंतर रात्री घुईखेडमध्ये शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. शंकर वाघाडे यांच्यामागे पत्नी, विवाहीत एक मुलगा, विवाहीत तीन मुली, नातवंडासह बराच मोठा आप्तपरिवार आहे. तळेगाव दशासर पोलीसांनी आकस्मीक मृत्युची नोंद केली आहे.