७० वर्षीय वृध्दाचे ५ वर्षांपासुन ले-आऊटच्या मोजणीकरीता हेलपाटे – चुकीच्या पध्दतीने लेआऊटची मोजणी झाल्याचा आरोप

0
667

दोषी अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्याची मागणी 

चांदूर रेल्वे – (शहेजाद खान) 

चांदूर रेल्वे शहरातील को-ऑपरेटीव्ह बँक कॉलनीत राहणाऱ्या ७० वर्षीय मोहन पुंडलीकराव माहुरे यांना ले-आऊटच्या व्यवस्थितपणे मोजणीकरण्याकरीता गेल्या ५ वर्षांपासुन हेलपाटे घ्यावे लागत असुन अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहे. लेआऊटची मोजणी चुकीच्या पध्दतीने करून माहुरे यांच्या प्लॉट नं. १ मध्ये प्लॉट नं. २ च्या खुना कायम केल्याचा आरोप त्यांनी केला असुन दोषी अधिकारी, कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्याची मागणी माहुरे यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्राव्दारे केली आहे.

चांदूर रेल्वे शहरातील सर्वे नं. ४०/१ मधील ६० आर लेआऊटमधील प्लॉट नं. २ वरील जुनघरे यांचे घर माहे एप्रिल २०१५ ला वानखडे यांनी विकत घेतले. विकत घेतल्यानंतर प्लॉट नंबर २ कमी आहे म्हणून संपूर्ण लेआऊटच्या मोजणी करिता रक्कम भूमी अभिलेख कार्यालय, चांदूर रेल्वे येथे भरणा केली. त्यानंतर भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकार्‍यांनी मोजणी करीता रीतसर नोटीस देऊन मोजणी केली. परंतु त्यांनी कोणत्याही प्लॉटच्या खुणा कायम न करता मोजणी करून निघून गेले. त्यानंतर चार-पाच दिवसांनी प्लॉट नं. १ चे धारक मोहन माहुरे यांनी भूमि अभिलेखच्या एका कर्मचाऱ्याला विचारना केली असता त्यांनी सांगितले की, सन १९८९-९० चे मंजूर झालेले लेआऊट चुकीचे झाले आहे. आम्ही तयार केलेल्या लेआऊटचा नकाशा मंजुरीकरिता चांदूर रेल्वे येथील एसडीओ कार्यालयात पाठवलेला आहे. त्यानंतर तुमच्या खुणा मोजणी करून पुन्हा कायम करण्यात येईल असे सांगितले होते. चार-पाच महिन्यांनंतर सदर कर्मचारी खुणा कायम करण्याकरिता आले असता त्यांनी मोजणीची सुरुवात माहुरे यांच्या प्लॉट नंबर १ पासून न करता आणि लेआऊटमधील नऊ मीटर चा रोड न मोजता प्लॉट नंबर ४  पासून मोजणी सुरुवात करून प्लॉट नंबर २ च्या माहुरे यांच्या मालकीच्या प्लॉट नंबर १ मध्ये खुणा कायम केल्या. ही त्यांनी केलेली मोजणी चुकीची केल्यामुळे अमरावती येथील भूमी अभिलेख अधीक्षक यांच्याकडे लेखी तक्रार नाहुरे यांनी केलेली होती. त्यानंतर माहुरे स्वतः अमरावती कार्यालयात अनेक वेळा गेल्यानंतरही अधिक्षकांनी मंजूर झालेल्या लेआउट प्रमाणे मोजणी करून देण्याबाबत भूमी अभिलेख कार्यालय, चांदूर रेल्वे ला लेखी सूचना दिल्या. त्यानंतरही पुन्हा चुकीच्याच पध्दतीने मोजणी करण्यात आली.  जुलै २०१५ ते २० मार्च २०१७ या कालावधीत पाच वेळा मोजणी झाली. परंतु ती रोड न मोजता व प्लॉट नंबर ४ पासून सुरुवात केली आणि प्रथम जी मोजणी केली त्याप्रमाणेच पाचही वेळा मोजणी केल्याचे मोहन माहुरे यांनी सांगितले. लेआऊटमधील प्लॉट नंबर २  च्या धारकाकडून हितसंबंध ठेऊन भुमि अभिलेखच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी ८९-९० च्या मंजूर झालेल्या लेआऊटप्रमाणे मोजणी न करता त्यांनी बनविलेल्या लेआऊटप्रमाणे मोजणी केल्याचाही आरोप केला. शेवटची मोजणी झाल्यानंतर भुमि अभिलेखच्या अधिकाऱ्यांनी कोर्टातून मोजणी करणेबाबत माहुरेंना सूचना केली. भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचारी योग्य न्याय न देता कोर्टात जाण्याचे मोफत मार्गदर्शन करतात, त्यामुळे अशा कर्मचार्‍यांना नोकरीतून बडतर्फ करण्यात यावे अशी मागणी मोहन माहुरे यांनी केली आहे.

नियमानूसार प्लॉटची मोजनी केली – राणे

मोहनराव माहुरे यांच्या शंकानूसार मी स्वतः प्लॉटची मोजनी करून खुना करून दिल्या. त्यांना ते मान्य नसल्याने अमरावतीच्या कार्यालयाकडे तक्रार केली. अमरावती कार्यालयाने पुन्हा धामणगाव कार्यालयाकडून प्लॉटची मोजनी करून केली. त्यांचे म्हणणे आहे की,त्यांच्या मर्जी प्रमाणे करून द्या असे होते. परंतु आम्ही नियमानुसार त्यांच्या सर्व प्रकारच्या मोजण्या करून दिल्या असल्याचे चांदूर रेल्वेचे भूमि अभिलेख अधिकारी राणे यांनी सांगीतले.