राज्यात शाश्वत स्वच्छतेची भरीव कामगिरी – पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर

0
694
o
Google search engine
Google search engine

पुणे – स्वच्छता सर्वेक्षण, स्वच्छता हीच सेवा, स्वच्छ सुंदर शौचालय यासारख्या केंद्र शासनाने आयोजित केलेल्या उपक्रम व स्पर्धामध्ये महाराष्ट्र राज्य अव्वल राहिले आहे. राज्यात शाश्वत स्वच्छतेची भरीव कामगिरी झाली असल्याचे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी आज केले.

                  येथील विधानभवन परिसरात राज्य शासनाच्या ग्रामविकास विभाग, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्यावतीने श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या स्वच्छता दिंडी व ग्रामसभा दिंडीचा शुभारंभ पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री लोणीकर यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वासराव देवकाते पाटील, विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर , जिल्हाधिकारी नवल किशोर राम,पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे उपसचिव अभय महाजन, कोल्हापुरचे मनपा आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर गावडे,  सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे,  अखिल भारतीय वारकरी मंडळाचे अध्यक्ष प्रकाश बोधले आदी उपस्थित होते.

                पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री लोणीकर म्हणाले, पंढरपूरची वारी हा देशातील सर्वात मोठा सोहळा आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने वारकऱ्यांच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश राज्यभरात पोहोचणार आहे. त्यामुळे या स्वच्छता दिंडीला वेगळे महत्व आहे. केंद्र शासनाच्या विविध उपक्रमात महाराष्ट्र सर्वात पुढे आहे. राज्यात मोठया प्रमाणात शौचालय उभारणीचा कार्यक्रम यशस्वी झाला असल्याचे त्यांनी सांगितले.

              पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या वतीने श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळयामध्ये स्वच्छता दिंडीच्या माध्यमातून लाखो वारकरी बांधवांचे प्रबोधन करण्याचे काम होत असल्याचे सांगून लोणीकर म्हणाले, स्वच्छता दिंडीच्या माध्यमातून ग्रामसभा, पर्यावरण, जलयुक्त शिवार, बेटी बचाव, बेटी पढाओ यासोबतच वृक्ष लागवड व संवर्धनाबाबतही प्रभावीपणे जागृती करण्याचे काम होणार आहे,

राज्यभरातील स्वच्छतेच्या कामात वारकरी संप्रदायाचा मोठा सहभाग आहे.  यावर्षीपासून पालखी सोहळयांसोबत फिरते शौचालये वाढविण्यात आली असून  पालखी मार्गावरील गावातील कुटुंबांनीही      वारक-यांसाठी स्वत:चे शौचालय उपलब्ध करून दिले आहे, मागील चार वर्षात वैयक्तिक शौचालयांची व्याप्ती वाढली  असल्याचे सांगून 33 कोटी वृक्ष लागवड मोहीमेतही प्रत्येकाने सहभाग नोंदवावा, असे आवाहन त्यांनी केले.

           विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर म्हणाले, स्वच्छता दिंडीचा उपक्रम गेल्या चौदा वर्षापासून सुरू आहे, या उपक्रमाच्या माध्यमातून केंद्र व राज्य शासनाच्या विविध उपक्रमाच्या माहितीसोबतच जागृतीचे प्रभावी कार्य होते. पालखी सोहळयात सर्व सोईसुविधा पुरविण्यावर शासनाचा भर असल्याचे त्यांनी सांगितले.

        यावेळी अखिल भारतीय वारकरी मंडळाचे अध्यक्ष प्रकाश बोधले यांचेही भाषण झाले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते स्वच्छता दिंडीच्या घडीपुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. तसेच विभागीयस्तरीय स्वच्छ ग्राम स्पर्धेचे पारितोषिके देण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला राज्यभरातून आलेल्या विविध कलापथकांनी आपली कला सादर केली. यावेळी स्वच्छता दिंडीत सहभागी कलाकार, नागरिक, अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.