मालखेड तलावातील जलस्तरात तीन फुटाने वाढ आमला विश्वेश्वर मात्र कोरडेच

0
736
Google search engine
Google search engine
चांदूर रेल्वे : (Shahejad Khan) 
गेल्या काही दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या दुष्काळी चांदूर रेल्वे शहरात रविवारी सायंकाळी ४.३० वाजतादरम्यान पावसाचे आगमन झाले. जवळपास दोन तास झालेल्या धुव्वाधार पावसाची ६५ मिमी इतकी नोंद घेण्यात आली. या पहिल्याच पावसाने पूर्णत: आटलेला मालखेड तलावाची जलपातळी तीन फुटांनी वाढल्याने शहरवासीयांना थोडा फार दिलासा मिळाला आहे..
पिण्याच्या पाण्यापासून जनावरच्या चाऱ्यापर्यंत संकट अधिक गडद होत होते. पेरण्या लांबल्या होत्या, खरीप धोक्यात आला होता. अखेर पावसाचे आगमन झाल्याने बळीराजाला दिलासा मिळाला आहे. रात्रीपर्यंत थोड्या फार प्रमाणात पाऊस सुरू होता. या पावसामुळे रविवारच्या आठवडी बाजारात मात्र व्यापारी व ग्राहकांची धावपळ झाली. तसेच अनेक वेळापर्यंत शहरातील वीजपुरवठा बंद होता. तर दुसरीकडे शेतकरी वर्ग कामाला लागला, संपूर्ण शेतीची मशागत करून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकरी वर्गाची बियाणे खरेदीसाठी गर्दी दुकानावर पाहायला मिळत आहे. शहरात गत दोन महिन्यांपासून पाण्याचा प्रचंड दुष्काळ पडला आहे. तर मालखेड तलावातील मृत जल साठ्याच्या भरवशावर पाणीपुरवठा सुरू आहे तोही काही दिवसाने कायमचा बंद होण्याच्या मार्गावर असताना पावसामुळे वाढलेल्या पातळीने आणखी १५ दिवस पाण्याची काळजी मिटली असल्याचे समजते. तर दुसरीकडे गेल्या ४ महिन्यांपासून दुष्काळात असणाऱ्या आमला विश्वेश्वर येथे मात्र २० मिमी असा अल्पसा पाऊस झाला पहिल्या पावसानंतर घेतलेल्या विश्रांतीमुळे वातावरणात प्रचंड उष्णता वाढली आहे, लवकरच नियमित पावसाला सुरवात होईल अशी आशा नागरिक बाळगून आहे.