विद्यार्थ्यांच्या शाळाप्रवेशासाठी वाई बोथ बनलं प्रति पंढरपूर सामाजिक एकतेचे दर्शन : गावातून पुस्तक पालखीची प्रदक्षिणा

0
526
Google search engine
Google search engine
चांदूर रेल्वे – (Shahejad Khan) 
गावात प्रत्येक अंगणासमोर रांगोळी …प्रत्येक घरासमोर पाट पडलेला….कुठे गजानन महाराजचा फोटो…तर कुठे समाज मंदिरासमोर महिला स्वागतासाठी सज्ज …बैल सुद्धा सजलेले…फुगे व हारांच्या आरासात मुलांची चहलपहल….बघता बघता टाळ मृदुंगाच्या निनादात सर्व गावं तल्लीन झालेलं …कुठे भीमगीते…तर कुठे चक्क महिलांचा  फुगळीचा फेर .जणू त्या गावात आषाढी एकादशी सारखं प्रति पंढरपूर अवतरलं होते,पण प्रसंग होता जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा वाई बोथ येथील विद्यार्थ्यांच्या शाळा प्रवेशाचा.
एकीकडे प्रथमच उन्हाळा लांबलेला आणि अचानक अगोदरच्या दिवशी झालेल्या पावसामुळे गावकरी सुखावले होते. शिक्षकांनी शाळेच्या पहिल्या दिवशी शाळा प्रवेश शुभारंभ साठी थोडे वेगळे पणाने साजरा करण्याचा मनोदय व्यक्त केला. गेल्या वर्षभरातील शाळेतील भौतिक व शैक्षणिक परिस्थितीत झालेल्या आमुलाग्र बदलामुळे गावकऱ्यांनी एकमताने आम्ही सर्व सहभागी होणार असल्याचे सांगितले. सकाळीच सर्व प्रवेश पात्र मुलीं गुलाबी लुगड्याचा पोशाखात सजलेल्या. त्यात शाहू महाराज यांच्या जयंती(सामाजिक न्याय दिन ) व जिजाऊ माता पुण्यतिथी असल्यामुळे विद्यार्थ्यांनी शाहू महाराज ,जिजाऊ मा, गाडगे महाराज,सावित्रीबाई फुले आणि विठ्ठल रुख्मिणी च्या वेशात नटलेले होते. गावकऱ्यांनी स्वतः बैलबंडीची सजावट करत त्या मध्ये प्रवेश पात्र मुलांना बसविले. पालकांनी पालखी तयार करून त्यात विठ्ठल रुख्मिणी च्या प्रतीमेसह पुस्तकांची सजावट केली होती. गावातील भजनी मंडळींच्या  पताका व टाळ-मृदुंगच्या निनादात गावकरी एकरूप झाले  होते. सरपंच सुनीताताई शेळके व शाळा व्यवस्थापन समिती प्रमुख भारतीताई चौधरी यांनी सुद्धा पालखीला खांदा देत प्रदक्षिणेत पुढाकार घेतला. गावात प्रत्येक घरासमोर पालखी धारकांचे पायांची पूजा करण्यात आली.
पालखी विठ्ठल रुख्मिणी मंदिरात दर्शननंतर आंबेडकर नगरात वयस्कर महिलांनी भिमगीते गाऊन मुलांचा उत्साह द्विगुणीत केला. अखेर शाळेत पालखीच्या अंतिम चरणात मुलींसह महिलांनी फुगडी चा फेर धरत भजनाच्या आसमंतात कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वितरण करण्यात आले. शाळा प्रवेशाच्या कार्यक्रमाला गावातील सरपंच सुनीता शेळके,शाळा व्यवस्थापन समिती प्रमुख भारती चौधरी, विषयतज्ज्ञ श्रीनाथ वानखडे,मुख्याध्यापक भारत वानखडे,सहायक शिक्षक गोविंद माहुलकर,शुभांगी अंबलकर,विनायक चौधरी,ज्ञानेश्वर ठाकरे,प्रकाश चौधरी,प्रमोद गेडेकार,गजानन सोनोने,रामेश्वर कुसराम,साधना काळमेघ,योगिता अमदुरे,रेखा गेडेकार,लता राऊत,सुमित्रा चौधरी सहित गावातील शेकडो नागरिक सहभागी झाले होते. शाळा प्रवेशाच्या या उपक्रमामुळे प्रत्येक गावकऱ्यांना प्रति पंढरपूर चा अनुभव येत होता.