पीएम किसान योजनेसाठी शेतकऱ्यांचे प्रशासनाला सहकार्य अपेक्षीत – तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांची माहिती अप्राप्त

0
1049
Google search engine
Google search engine

शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

चांदूर रेल्वे – (Shahejad Khan)

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेंतर्गत केंद्र शासनाने निकष शिथिल केल्याने लाभार्थी शेतकरी कुटुंबांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. शेतकरी कुटुंबासाठी दोन हेक्टरची मर्यादा रद्द केल्याने सरसकट शेतकरी कुटुंबे योजनेसाठी पात्र ठरली आहेत. चांदूर रेल्वे तालुक्यातील शेतकरी कुटुंबांना योजनेचा लाभ मिळणार असुनही अनेक शेतकऱ्यांची माहिती अजुनही प्रशासनाला अप्राप्त आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे महसुल प्रशासनाला सहकार्य अपेक्षीत आहे.

केंद्र शासनाने ७ जुनला राज्य शासनाला पत्र पाठवून सरसकट सर्व पात्र शेतकऱ्यांना योजना लागू करण्याचे आदेश दिले. यानंतर क्षेत्र मर्यादेची कोणतीही अट नसल्याने सर्व पात्र लाभार्थी शेतकरी कुटुंबाच्या याद्या संकलित करून वेळोवेळी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सुचनांनुसार पीएम किसान पोर्टलवर माहिती अपलोड करण्याची तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी तहसील कार्यालयाला 15 जुनला दिले. शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्यासाठी केंद्र शासनाने ही योजना सुरू केली. या योजनेंतर्गत शेतकरी कुटुंबाला सहा हजारांचे आर्थिक सहकार्य तीन टप्प्यांमध्ये देण्यात येत आहे. शेतकरी कुटुंबाचे लागवड योग्य क्षेत्राची कमाल दोन हेक्टपर्यंतची मर्यादा आता रद्द करण्यात आली आहे. शेतकरी कुटुंबांच्या अपात्रतेच्या इतर निकषांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. अगोदरच्या निकषानुसार पात्र शेतकऱ्यांना योजनेचा लाभ देण्यात येत आहे. यासाठी पात्र सर्व शेतकऱ्यांनी बँकेचा तपशील, आधार कार्डची प्रत, मोबाईल क्रमांक इत्यादी माहिती संबंधित गावातील तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यांच्याकडे देणे महत्वाचे आहे. परंतु तालुक्यातील अनेक गावात जमीनी घेतल्यानंतर काही गावात सदर शेतकरी राहत नसल्यामुळे त्यांची कागदपत्रे प्रशासनाला मिळालेली नाही. याशिवाय अनेक कारणांमुळे योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांची कागदपत्रे अप्राप्त आहे. तरी शेतकरी बंधूंनी प्रशासनाला सहकार्य करून योजनेसाठी लागणारी कागदपत्रे ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक यांच्याकडे जमा करावी जेणेकरून कुठलाही पात्र शेतकरी योजनेपासुन वंचित राहू नये असे आवाहन तहसीलदार राजेंद्र इंगळे यांनी केले आहे.