आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना बियाणेवाटप- शेतकऱ्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधताना कृषी मंत्री गहिवरले

0
526
Google search engine
Google search engine

अमरावती : आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या कुटुंबियांना बियाणे वाटपाच्या कार्यक्रमात त्यांच्याशी संवाद साधताना त्यांचे अश्रू पाहून कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांच्याही अश्रूंचा बांध फुटला.

गॅलक्सी फाऊंडेशनतर्फे विमलाबाई देशमुख सभागृहात आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या कुटुंबांना बियाणे वाटपाचा कार्यक्रम आज झाला. त्यावेळी हा भावपूर्ण प्रसंग घडला. यावेळी आत्महत्या केलेल्या शेतक-यांच्या विधवा भगिनींच्या डोळ्यांतील आसवे पाहून कृषी मंत्र्यांच्या अश्रूंचा बांध फुटला. संपूर्ण सभागृहच यावेळी भावूक झाले होते.

खासदार नवनीत रवी राणा, आत्मा शेतकरी सल्लागार समितीचे अध्यक्ष अरविंद नळकांडे, कृषी सहसंचालक सुभाष नागरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे, संस्थेचे श्यामल चटर्जी, प्रवीण मनोहर आदी उपस्थित होते.

शेतकरी कुटुंबांशी संवाद साधताना कृषी मंत्री डॉ. बोंडे म्हणाले की, जीवन अतिशय सुंदर आहे. जीवनात अनेक खडतर प्रसंग येत असतात. त्यातून वाट काढून दु:खावर मात केली पाहिजे. आज माझ्या बहिणींच्या डोळ्यांत अश्रू आहेत. शेतकरी बांधवालाही आपल्या कुटुंबाची स्थिती पाहून दु:ख होत असणार. या स्थितीवर मात करण्यासाठी आपण सगळ्यांनी एकमेकांना सांभाळले पाहिजे. ते सांभाळण्यासाठी असे संवेदनशील उपक्रम सातत्याने होत राहिले पाहिजेत. आत्महत्येसारखे प्रकार थांबविण्यासाठी शेतक-यांच्या प्रश्नांकडे संवेदनशीलपणे पाहण्याची गरज आहे. काळ्या आईची सेवा करणा-यांना मदतीचा हात देणा-यांचे शासनाकडून सदैव स्वागत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसहभागाच्या माध्यमातून जशी जलयुक्त शिवार योजनेत प्रचंड कामे घडवून आणली, तशी लोकसहभागाची साखळी प्रत्येक उपक्रमामागे हवी, असे सांगून डॉ. बोंडे म्हणाले की, शेतक-यांचे उत्पन्न 2022 पर्यंत दुप्पट करण्याचा निर्धार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केला आहे. त्यासाठी केवळ तृणधान्य पीकेच नव्हे, तर अधिक उत्पन्न देणा-या पीकांचे क्षेत्र वाढविणे, पूरक व्यवसायांची वाढ करण्यासाठी अनेक नवीन योजना, उपक्रम केंद्र व राज्य शासनाने अंमलात आणले आहेत.

जगाचा पोशिंदा असणा-या शेतकरी बांधवांसाठी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसह विविध उपक्रम सातत्याने राबवले गेले पाहिजेत, असे खासदार श्रीमती राणा यांनी सांगितले. यावेळी गॅलक्सी फाऊंडेशनतर्फे जिल्ह्यातील 41 आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना सोयाबीन बियाण्यांचे वाटप करण्यात आले. नंदकुमार कुइथे यांच्या वतीने कपाशी बियाण्याच्या 60 बॅग संस्थेच्या उपक्रमासाठी सुपुर्द करण्यात आल्या. श्री. मनोहर यांनी प्रास्ताविक केले. श्री. पंकज साबळे यांनी आभार मानले.