युती न झाल्यास वंचित बहुजन आघाडीकडे उमेदवारांचा कल – विधानसभेच्या निवडणुकीसाठी संभाव्य उमेदवारांनी कसली कंबर

0
635
Google search engine
Google search engine

चांदूर रेल्वे – (शहेजाद खान)

    गेल्या वर्षभरात आणि ऐन लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी राज्यात वंचित बहुजन आघाडी ही तिसरा पर्याय म्हणून पुढे आली. वंचित बहुजन आघाडीच्या सभांना झालेली गर्दी पाहता लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीच्या उमेदवारांनी विशेष लक्ष वेधून घेतले होते. वंचितने राज्यभरात लोकसभेत ४० लाखावर मते घेत तिसरा पर्याय म्हणून स्वत:ला सिद्ध केले. अशातच विधानसभा निवडणुकीत आता वंचित बहुजन आघाडी निर्णायक ठरण्याची शक्यता असुन काँग्रेससोबत युती न झाल्यास वंचित आघाडीतर्फे धामणगाव विधानसभा मतदार संघात उमेदवार कोण राहणार ? याबाबत जिकडेतिकडे चांगलीच चर्चा रंगली आहे.

      लोकसभा निवडणुकीपूर्वी भारिप बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. प्रकाश ऊर्फ बाळासाहेब आंबेडकर आणि एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी यांच्या वंचित बहुजन आघाडीच्या सभांना लोकसभेत संपूर्ण राज्यात मिळालेला प्रतिसाद बघता वंचित आघाडी ही राज्यात तिसरा पर्याय म्हणून पुढे येऊ शकेल, अशी शक्यता वर्तविली जात होती आणि झालेही तसेच. परंतु औरंगाबाद येथील वंचित बहुजन आघाडीचा एकमेव उमेदवार निवडून आला. आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना दोन्ही जागांवर पराभव पत्करावा लागला असला तरी, वंचितच्या उमेदवारांनी भरभरून मते घेतली. अनेक उमेदवारांनी लाखांवर मते घेतली. त्यामुळे राज्यात वंचित बहुजन आघाडीने आपला एक दबदबा निर्माण केला, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे आता हाच दबदबा विधानसभा निवडणुकीत आणखीच वाढणार आहे. काँग्रेस पक्षासोबत युती न झाल्यास वंचित बहुजन आघाडी लोकसभेप्रमाणे स्वतंत्र लढणार असल्याचे समजते. अशातच धामणगाव रेल्वे – चांदूर रेल्वे विधानसभा मतदार संघात सुध्दा वंचित बहुजन आघाडीची क्रेज अजुनही पहावयास मिळत आहे. मागील काही वर्षात प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राज्यातील विद्यार्थी व तरुण वर्ग मोठ्या प्रमाणावर जुळला. लोकसभेत धामणगाव मतदार संघातील निंभा, कळमगाव (मतदान केंद्र क्र. १९८), सावनेर (मतदान केंद्र क्र. १७८), बेलोरा हिरपुर, शाहापुर या गावात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला इतर पक्षापेक्षा जास्त मते मिळाली. तर फुलआमला, दाभा, गव्हा फरकाडे, निंभोरा, अडगाव, हिवरा, जळू, मांजरखेड (क.), टेंभुर्णी, मांडवा, शिरजगाव कोरडे, चांदूर रेल्वे (मतदान केंद्र क्र. ७८), चांदसुरा, माहुली चोर, सोनगाव, पळसखेड (मतदान केंद्र क्र. १७३), वाघोली, सोनोरा, जावरा, आसेगाव, पिंपळगाव निपानी या गावांत लोकसभेमध्ये वंचितला चांगली आघाडी मिळाली आहे. त्यामुळे या मतदार संघात वंचित आघाडीचा काही प्रमाणात बोलबाला असुन स्थानिक उमेदवार मिळाल्यास वंचित बहुजन आघाडीला चांगला प्रतिसाद विधानसभा निवडणुकीत मिळू शकतो. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी लोकसभेत राज्यात ४० लाखावर मते घेतली आहेत. अनेक उमेदवारांनी लाखावर मते घेतली. अनेक उमेदवार दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमाांवर राहिले. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीची चिंता निश्चितच वाढली आहे. तेव्हा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीची भूमिका ही महत्त्वाची राहील, नव्हे तर निर्णायक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

घुईखेडकर व विश्वकर्मा यांच्या नावाची चर्चा

मुळचे काँग्रेस पक्षाचे असलेले युवा नेते निलेश विश्वकर्मा व माजी जि. प. सदस्य तथा चांदूर रेल्वे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रविण घुईखेडकर हे दोघेही यंदाची विधानसभा निवडणुक लढण्यास इच्छुक आहे. दोघेही अख्या मतदार संघ पिंजुन काढत मतदारांच्या भेटीगाठी घेत आहे. दोघेही सुरूवातीला काँग्रेस पक्षाकडेच तिकिट मागणार आहे. परंतु येथे स्थानिक काँग्रेसचे आमदार असल्यामुळे त्यांचे तिकीट कापले जाणार नाही. आणि काँग्रेस पक्षाकडून विधानसभेसाठी घुईखेडकर व विश्वकर्मा यांची दखल घेतल्या गेली नाही तर ते इतर पक्षाकडून किंवा अपक्ष उभे राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे या दोघांपैकी एक युती न झाल्यास वंचित बहुजन आघाडीचे संभाव्य उमेदवार असणार असल्याची चर्चा मतदार संघात धडाक्यात सुरू आहे.