घुईखेड येथील वारंवार खंडीत होणारा विद्युत पुरवठा सुरळीत करा – खासदार नवनीत राणा यांचे विद्युत कंपनीचे अधीक्षक अभियंता यांना निर्देश

0
551
Google search engine
Google search engine
घुईखेड – (Shahejad Khan)  
     चांदूर रेल्वे तालुक्यातील घुईखेड येथे वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असून यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे त्रस्त नागरिकांनी थेट अमरावतीच्या खासदार नवनीत रवी राणा यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देऊन यामध्ये लक्ष घालण्याची मागणी केली. यानंतर खासदार नवनीत राणा यांनी त्यांच्या लोकसभा मतदार संघातील प्रश्न नसतांना सुध्दा अमरावती जिल्ह्यातील नागरीकांची समस्या असल्याचे लक्षात घेऊन तातडीने अमरावती येथील विद्युत कंपनीचे अधीक्षक अभियंता यांना पत्र लिहून घुईखेड मधील विद्युत पुरवठा सुरळीत करण्याबाबत निर्देश दिले.
     चांदूर रेल्वे उपविभागांतर्गत येणाऱ्या घुईखेड येथील विद्युत पुरवठा थोडी हवा सुटली तरी खंडित होतो व खंडित झालेला विद्युत पुरवठा पाच ते सहा तास येतच नाही. कधीकधी तर संपूर्ण रात्र अंधारातच त्यांना काढावी लागत आहे. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे कर्मचारी यांना लाईन बंद झाली तेव्हा लाईन कधी येणार ? अशी विचारणा केली असता कर्मचारी “आमच्या हातात लाईन चालू करून देण्याची जबाबदारी नाही” असे म्हणत उध्दटपणे उत्तर देत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला. त्यासंबंधात बरेचदा चांदूर रेल्वे येथील कार्यालयाला फोन केला तर उचलत नाही तसेच उचलला तर व्यवस्थितपणे उत्तर देत नसल्याचे काही नागरिकांनी सांगितले. तसेच शेतातील कृषी मोटर पंप सुद्धा बरेच दिवसापासून बंद आहे, बऱ्याच ठिकाणी पोल आतापर्यंत पडलेलेच आहे. याची दखल सुद्धा घेतलेली नाही. तर आजूबाजूच्या गावातील लाईन व्यवस्थितपणे सुरू राहते.  त्यामुळे घुईखेड गावातीलच लाईन वारंवार का बंद पडते व कर्मचाऱ्यांना याचे तांत्रिक कारण का कळत नाही ? असा प्रश्न गावकऱ्यांना पडला आहे. त्यामुळे त्रस्त गावकरी यांनी अमरावतीचे खासदार नवनीत राणा यांची भेट घेऊन याबाबतचे निवेदन दिले.  खासदार नवनीत राणा यांनी विलंब न करता घुईखेड गावात वारंवार लाईन जात असल्याने त्याठिकाणी स्थळ निरीक्षण करून घुईखेड येथील नागरिकांच्या तक्रारी लक्षात घेऊन त्यावर निवेदनाप्रमाणे तातडीने कारवाई करावी व केलेल्या कारवाईचा अहवाल मला देण्यात यावा असे स्पष्ट निर्देश महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी अमरावतीचे अधीक्षक अभियंता यांना पत्राद्वारे दिले.
दोन आमदार, एक खासदार असतांनाही दुसऱ्या खासदाराने घेतली दखल
चांदूर रेल्वे तालुक्यातील घुईखेड गावात विद्युत पुरवठ्यासह अनेक समस्या आहेत. मात्र या गावाकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नाही. दोन आमदार, एक खासदार चांदूर रेल्वे तालुक्याला लाभलेले असतांना अमरावती जिल्ह्यातील दुसऱ्या खासदाराला या गावातील समस्येची दखल घ्यावी लागते ही एक शोकांतीकाच असल्याचे मत काहींनी व्यक्त केले.