पाचव्या दिवशीही अपंग सेवानिवृत्त सफाई कामगाराचे आमरण उपोषण सुरूच -वरिष्ठ अधिकाऱ्यांची टोलवाटोलवी

0
573

उपोषणकर्त्यांचा जीव टांगणीला !

चांदूर रेल्वे – (शहेजाद खान) 

     सलग पाच दिवसापासुन आपल्या मुलाला नोकरीमध्ये सामावुन घेण्यात यावे या मागणीसाठी शहरातील एका सेवानिवृत्त अपंग सफाई कामगार स्थानिक न. प. समोर आमरण उपोषण करीत आहे. गेल्या ५ दिवसापासुन अन्नावाचून त्यांचा जीव टांगणीला लागलेला असतांना आयुक्त, जिल्हाधिकारी, मुख्याधिकारी एकमेकांकडे टोलवाटोलवी करीत असल्याचे चित्र दिसत आहे.

      ११ जुलैपासुन न. प. चे अपंग सेवानिवृत्त कर्मचारी अनिल वामनराव वानखडे स्थानिक नगर परिषदसमोर आमरण उपोषण करीत आहे. त्यांनी नोकरीतुन स्वेच्छा निवृत्ती घेतल्यानंतर शासन निर्णयाप्रमाणे त्यांच्याजागी त्यांचा मुलगा सौरभ याला सफाई कामगार पदावर नोकरी देण्याची मागणी केली. परंतु स्थानिक नगर परिषदमध्ये सभागृहात याविषयी ठराव झाल्यानंतरही प्रशासनातर्फे याची अंमलबजावणी करण्यात आली नव्हती. त्यामुळे नाईलाजास्तव आपल्या रास्त मागणीसाठी अनिल वानखडे यांनी आमरण उपोषणाचा मार्ग पत्करला. परंतु उपोषणाला पाच दिवस झाल्यानंतरही त्यांच्या मागणीवर तोडगा निघालेला नसुन वरिष्ठ अधिकारीवर्ग एकमेकांकडे बोट दाखवित असल्याचे दिसते. सोमवारी स्थानिक प्रभारी उपविभागीय अधिकारी राजेंद्र इंगळे यांनी या प्रकरणात स्वत: लक्ष देऊन मुख्याधिकारी यांना तत्काळ तोडगा काढण्याचे आदेश दिले. मात्र मुख्याधिकारी यांनी या पत्रानंतर पोलीस स्टेशनला पत्र देऊन उपोषणकर्त्याला वैद्यकीय तपासणीसाठी नेण्याचे सुचविले. यानंतर विधानपरिषद आमदार अरूण अडसड यांनीही सोमवारी जिल्हाधिकारी यांना पत्र देऊन या उपोषणकर्त्याला न्याय देण्याची मागणी केले. याशिवाय आमदार वीरेंद्र जगताप यांनी जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त यांच्याशी फोनवरून वार्तालाप करून यावर तोडगा काढण्याची मागणी केली. व आ. जगताप यांच्यामार्फत उपोषणकर्त्याच्या नातेवाईकासह एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांशी प्रत्यक्ष भेट घेतली. यादरम्यान जिल्हाधिकारी यांनी या प्रकरणासारखे इतर सारखे प्रकरण जिल्ह्यात असतील तर त्याचा अभ्यास करण्याचे आदेश त्यांनी संबंधितांना दिले. तर विभागीय आयुक्त यांनी सदर मागणी रास्त असुन याविषयी मुख्याधिकाऱ्यांनी कारवाई करावी अन्यथा मी स्वत: आदेश काढणार असल्याचे बोलले. असे असतांना मात्र कोणीही प्रत्यक्ष कृती करायला तयार नाही. या सगळ्या गोंधळात त्या बिचाऱ्या उपोषणकर्त्याचा नाहक बळी जाणार तर नाही ना ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.