भिवापूर येथे चार मृत सायळ जप्त – एका आरोपीला अटक, तिघे फरार

0
873
Google search engine
Google search engine
चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्रातील माळेगाव वर्तुळातील कर्मचाऱ्यांची कारवाई
चांदूर रेल्वे – (शहेजाद खान) 
    चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या भिवापूर येथे एका घरात धाड टाकून चार मृत सायळ जप्त केल्या असून एका आरोपीला अटक केली आहे. तर तीन आरोपी फरार होण्यात यशस्वी झाले. ही कारवाई चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या माळेगाव वर्तुळातील कर्मचाऱ्यांनी केली.
    चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या मौजा भिवापूर येथे झालेल्या वन्यप्राणी शिकारीबाबत प्राप्त झालेल्या गुप्त माहितीवरून वनपाल, माळेगाव वर्तुळ यांनी पथक तयार करून व इतर कर्मचाऱ्यांसह तसेच दोन पंच यांच्यासह मौजा भिवापूर येथील आरोपी विशाल किसन राठोड याच्या घराची झाडाझडती घेतली असता घरामध्ये मृतावस्थेत चार वन्यप्राणी सायळ आढळून आले.  त्यामुळे सदर आरोपीस अटक करत असतांना या गुन्ह्यांमध्ये त्याच्यासोबत सामाविष्ट असलेले गोकुल रामदास चव्हाण, दिनेश भाऊराव चव्हाण, मंगल देविदास जाधव हे तीन आरोपी घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले. आरोपीच्या घरातून मृत चार वन्यप्राणी ताब्यात घेऊन जप्तीनामा व पंचासमक्ष आरोपीचे घरी मौका पंचनामा नोंदविण्यात आला व आरोपी विशाल किसन राठोड ला चौकशीकामी वन्य जीव (संरक्षण) अधिनियम १९७२ चे कलम ५० अन्वये अटक करण्यात आली व सदर गुन्ह्यातील आरोपी यांचे विरुद्ध वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ च्या कलम ९, ३९ (२), ३९ (३), (अ), ४८ (अ), ५० व भारतीय दंड विधान १८६० चे कलम ३४ नुसार वनगुन्हा नोंदविण्यात आला. अटक आरोपी विशाल राठोड याला प्रथम श्रेणी न्यायालय, तिवसा येथे ते हजर केले असता न्यायालयाने १४ जुलै पर्यंत वनकोठडीस मंजुरी दिलेली आहे. या कारवाईत आरोपींकडून दोन मृत नर व दोन मृत मादी सायळ वन्यप्राणी तसेच काठ्या जप्त करण्यात आल्या. या प्रकरणाचा पुढील तपास माळेगावचे वनपाल एस. पी. धापड हे अमरावतीचे उपवनसंरक्षण गजेंद्र नरवणे, सहाय्यक वनसंरक्षक आर. जी. बोंडे व चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्राचे अधिकारी आशिष कोकाटे यांच्या मार्गदर्शनात करीत आहे. या कारवाई मध्ये हे माळेगावचे वनपाल एस. पी. धापड, परीक्षाविधीन वनक्षेत्रपाल पी. एन. तिडके, वनरक्षक पी. ओ. तिवारी, के. जी. रेखे, एस. डब्ल्यू. थोटे, वाहन चालक एस. पी. पंचभाई, वनमजूर धनराज गवई आदी कर्मचाऱ्यांचा समावेश होता.