चांदूर रेल्वेत महिला मेळाव्यात तज्ञ मार्गदर्शकांऐवजी केवळ राजकीय नेते व अधिकारी – बचत गटांना मेळाव्यासाठी बीडीओंची सक्ती

0
512
Google search engine
Google search engine
राजकीय फायद्यासाठी महिला मेळावा असल्याचा आरोप
चांदूर रेल्वे – (ता. प्र.)
    रोजगार संदर्भात कोण तज्ञ मार्गदर्शन करणार यांचे निमंत्रण पत्रिकेत नाव नाही, कोणत्या रोजगारासाठी हा मेळावा आयोजित केला याचा साधा उल्लेख नाही. केवळ राजकीय फायद्यासाठी महिलांना एकत्रित करण्याकरिता आयोजित केलेल्या मेळाव्याला बचत गटाच्या महिलांना उपस्थित राहण्याची सक्ती चांदूर रेल्वे येथील गटविकास अधिकाऱ्यांनी केल्याचा आरोप करण्यात आला असुन त्यांच्या विरोधात महिलांनी एल्गार पुकारला आहे. सदर बीडिओवर कारवाई करण्याची मागणी काही महिला बचत गटांनी केल्याचे समजते.
      गुरुवारी चांदूर रेल्वे शहरात महाराष्ट्र शासन अंगीकृत महिला आर्थिक विकास महामंडळ, अमरावतीच्या वतीने दिशा लोकसंचालित साधन केंद्र, चांदूर रेल्वे च्या अंतर्गत सभा व मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याच्या पत्रिकेत केवळ राजकीय नेत्यांची व शासकीय अधिकाऱ्यांची नावे होती. महिलांना कोणत्या उद्योगासंदर्भात मार्गदर्शन करण्यात येणार किंवा कोणता लघुउद्योग कसा सुरु करावा असे निमंत्रण पत्रिकेत नमूद केले नाही किंवा जिल्ह्यातील विशेष मार्गदर्शक या मेळाव्याला बोलावण्यात आले नाही. असे असतांना मात्र पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुधाकर उमप यांनी महिला बचत गटांना या मेळाव्यास उपस्थित राहण्यास सक्ती केली. थेट सोशल मीडियावर महिला बचत गटांना आदेशाचे मॅसेज व्हायरल करून केले. गटविकास अधिकारी यांनी या मेळाव्याला उपस्थित राहिल्या नाही तर कोणत्याही शासकीय योजनेची लाभ मिळू देणार नाही अशी तोंडी धमकी काही महिला बचत गटांच्या महिलांना दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. महिलांसाठी केंद्र व राज्य शासन विविध योजना राबवित आहे. मात्र केवळ राजकीय फायद्यासाठी आयोजित केलेल्या महिला मेळाव्यात उपस्थित राहण्याची सक्ती करणारे गटविकास अधिकारी उमप यांच्यावर कारवाई करावी अन्यथा उपोषणा शिवाय पर्याय राहणार नाही असा इशारा तालुक्यातील काही महिला बचत गटांनी दिला आहे.

धमकी दिली नाही – बीडीओ उमप 

महिला मेळावा पंचायत समितीचा नव्हता. सदर आयोजन महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने होते. पाहूणे म्हणुन बोलाविल्यामुळे मी केवळ अर्ध्या तासासाठी कार्यक्रमात गेले होतो. फोन कोणालाही केला नसुन मेळावा शासनाशी निगडीत असल्यामुळे सचिव, विस्तार अधिकारी यांच्यामार्फत इच्छुकांनी येऊ शकता असे कळविले. मी धमकी वगैरे काही दिली नाही व शासनाच्या नियमात बसतात त्यांना लाभ द्यावाच लागतो असे गटविकास अधिकारी उमप यांनी म्हटले.