रेल्वे स्टेशन चौकातील उड्डाणपुलासाठी 250 कोटींची मागणी ; खासदार डॉ.अनिल बोंडे यांचे रेल्वेमंत्र्यांना निवेदन

 

अमरावती : रेल्वे स्टेशन चौकातील विविध मार्गांना जोडणारा उड्डाणपूल धोकादायक झाल्याने या ठिकाणी नवीन उड्डाणपूल निर्माण करण्यासाठी खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी पुढाकार घेतला आहे. डॉ.बोंडे यांनी यासंदर्भात रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे 250 कोटी रुपयांची मागणी केली आहे. वैष्णव यांनी त्यांच्या या निवेदनावर सकारात्मक प्रतिसाद देत तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना रेल्वे विभागाला दिल्या आहेत.

रेल्वे स्टेशन चौकातील उड्डाणपूलाचे निर्माण हे 1964 मध्ये करण्यात आले होते. दिवसेंदिवस वाढलेल्या नागरीकरणामुळे मोठ्याप्रमाणात ताण या पुलावर निर्माण होत आहे. शिवाय दिवसभरात मोठ्या प्रमाणातील वाहतूक या पुलावरून होते. वाढते शहरीकरण वाहनांची संख्या लक्षात घेता हा पुल अरुंद असल्याने वाहतुकीची मोठी समस्या निर्माण होते. शिवाय 1964 मधील बांधकाम असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हा पूल धोकादायक असल्याचं घोषित केले आहे. पोलीस विभागाकडून अधिसूचना प्रसिद्ध करत या पुलावरून वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. रेल्वे स्टेशन चौकातून राजकमल चौक, जयस्तंभ चौक, हमालपुरा अशा विविध मार्गाना हा पुल जोडतो. त्यामुळे या ठिकाणी वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी नवीन उड्डाणपूल निर्माण करण्याची गरज असल्याची बाब खासदार डॉ.अनिल बोंडे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना लक्षात आणून दिली. बोंडे यांनी या संदर्भातील निवेदन गुरुवारी (ता.२४) मंत्री अश्विनी वैष्णव यांना दिले. दरम्यान त्यांनी या ठिकाणी प्रशस्त असा भव्य उड्डाणपूल उभारल्यास वाहतुकीची समस्या कायमस्वरूपी सुटेल त्यासाठी रेल्वे विभागाने 250 कोटी रुपयांचा निधी द्यावा अशी मागणी देखील केली. यासंदर्भातील पत्र डॉ.अनिल बोंडे यांनी अश्विनी वैष्णव यांना दिले. त्यावर वैष्णव यांनी तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना रेल्वे विभागाच्या प्रधान सचिवांना दिल्या.