सिंदेवाही येथे शासकीय वनविद्या महाविद्यालय स्‍थापन करण्‍याबाबत त्‍वरीत मंत्रीमंडळासमोर प्रस्‍ताव सादर करण्‍याचे अर्थमंत्र्यांचे निर्देश

0
888

सिंदेवाही ता. प्र.-डॉ.  पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत चंद्रपूर जिल्‍हयातील सिंदेवाही येथे शासकीय वनविद्या महाविद्यालय स्‍थापन करण्‍याबाबत त्‍वरीत मंत्रीमंडळासमोर  प्रस्‍ताव सादर करण्‍यात यावा, असे आदेश अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी संबंधितांना दिले.

दिनांक 21 ऑगस्‍ट रोजी मंत्रालयात वरील विषयासंदर्भात झालेल्‍या बैठकीत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वरील निर्देश दिले. बैठकीला विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे, खा. अशोक नेते, आ. देवराव होळी, आ. कृष्‍णा गजबे,  कृषी, नियोजन व वित्‍त विभागाचे अपर मुख्‍य सचिव यांची तसेच रमेश भुरसे, रवि ओल्‍लालवार, अक्षय उईके, बाबुराव कोहळे, रविकिरण समर्थ आदींची उपस्थिती होती.

विधीमंडळाच्‍या सन 2019 च्‍या पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सिंदेवाही येथे शासकीय वनविद्या महाविद्यालय स्‍थापन करण्‍याबाबत केलेल्‍या मागणीच्‍या अनुषंगाने अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेल्‍या आश्‍वासनानुसार सदर बैठक आयोजित करण्‍यात आली होती. याबाबत त्‍वरीत मंत्रीमंडळासमोर प्रस्‍ताव सादर करण्‍याचे निर्देश अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.