आज ऑलम्पिकपटू अशोककुमार ध्यानचंद चांदूर रेल्वेत – थोड्याच वेळात अशोक महाविद्यालयातील रस्सीखेच स्पर्धेचे करणार उद्घाटन

0
652

भाजयुमोप्रदेश उपाध्यक्ष प्रताप अडसड यांचे आयोजन

चांदूर रेल्वे – (शहेजाद खान)

पारंपारिक खेळाला उत्तेजन मिळावे, ग्रामीण भागातील युवकांमधील गुणवत्तेचा वेध घेता यावा यासाठी भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष प्रताप अडसड यांच्या पुढाकाराने तिनही तालुक्यात ऑलम्पिक खेळात मानाचे स्थान असलेल्या रस्सीखेच स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून आज शुक्रवारी चांदूर रेल्वे येथे या स्पर्धेचे उद्घाटन ऑलम्पिकपटू अशोककुमार ध्यानचंद यांच्याहस्ते होणार आहे.

हॉकीचे जादुगार मेजर ध्यानचंद यांची जयंती व राष्ट्रीय क्रिडा दिनानिमित्त वय १८ ते ३५ पुरुष वयोगटातील ही निशुल्क रस्सीखेच स्पर्धा आयोजित केली आहे. आज शुक्रवारी सकाळी १० वाजता चांदूर रेल्वे येथील साव. मदनगोपाल मुंधडा महाविद्यालयाच्या (अशोक महाविद्यालय) प्रांगणात ही स्पर्धा सुरू होईल. यावेळी अध्यक्षस्थानी विधानपरिषद आमदार अरूण अडसड तर उद्घाटक म्हणून पद्मश्री प्रसिद्ध अॉलम्पिक क्रिडापटू अशोककुमार ध्यानचंदजी यांची उपस्थिती राहणार आहे. या सोबतच ही स्पर्धा नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील स्पर्धकांसाठी लोणी टाकळी येथे उद्या शनिवारी २४ ऑगस्ट ला सकाळी ९ वाजता तर धामणगाव तालुक्यातील स्पर्धकांकरिता सोमवारी २६ ऑगस्ट रोजी माताजी मंदिरासमोरील स्व. दादारावजी अडसड क्रीडांगण येथे ही रस्सीखेच स्पर्धा सकाळी ९ वाजता सुरू होईल. या दोन्ही ठिकाणी रोमहर्षक सामने पहायला मिळणार आहे. तिनही तालुक्यातील विजयी झालेल्या प्रतिस्पर्धी संघाची अंतिम फेरी नांदगाव खंडेश्वर येथे राष्ट्रीय क्रीडा दिनी गुरुवार २९ ऑगस्ट ला सकाळी ९ वाजता राहणार आहे. या अंतिम फेरीत विजयी संघाला प्रथम बक्षीस पंधरा हजार, व्दितीय अकरा हजार, तृतीय सात हजार रुपये तसेच प्रत्येक मंडळास प्रोत्साहनपर तीनशे रुपये व प्रत्येक स्पर्धकास प्रशस्ती पञ देण्यात येणार आहे.

ही स्पर्धा धामणगाव रेल्वे मतदारसंघ म्हणजेच चांदूर रेल्वे, नांदगाव खंडेश्वर व धामणगाव रेल्वे या तीन तालुक्यापर्यंतच मर्यादित आहे. प्रत्येक संघात बारा स्पर्धक अनिवार्य राहतील. संघातील एकूण गटाचे वजन ६५० ते ७२० किलोग्राम राहतील. एका संघातील स्पर्धक दुसऱ्या संघात खेळता येणार नाही व पंचाचा निर्णय अंतिम राहणार असल्याची माहिती आयोजन समितीने दिली.