सामाजिक लोकचळवळ उभी करणाऱ्या अनिल गावंडे यांचा शिवसेनेत प्रवेश – उद्धव ठाकरेंनी बांधले शिवबंधन

0
702
Google search engine
Google search engine

शेकडो समर्थकांचाही प्रवेश

मान्यवरांची उपस्थिती

अकोलाः लोकजागर मंचच्या माध्यमातुन अकोला जिल्ह्यासह आकोट तेल्हारा तालुक्यात सामाजिक लोकचळवळ उभी करणाऱ्या अनिल गावंडे यांचा काल मुंबई येथे शिवसेनेत प्रवेश झाला. लोकजागर मंच चे संस्थापक अनिलभाऊ गावंडे यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह मुंबईत सेनेत प्रवेश केला. यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या हातावर शिवबंधन बांधून त्यांचे सेनेत स्वागत केले.
यावेळी सेनेचे जेष्ठ आमदार गोपीकिशन बाजोरिया, जिल्हाप्रमुख नितीन देशमुख, उप जिल्हाप्रमुख गोपाल दातकर,युवासेना जिल्हाप्रमुख विठ्ठल सरप पाटील,माजी जि. प. सदस्य महादेव गवळे, लोकजागरचे जिल्हाध्यक्ष गजानन बोरोकार, सुधाकर खुमकर, गोपाल जलंमकार, दिलीप पीवाल, पप्पू सोनटक्के, रामा फाटकर, श्रीकांत पागृत, तात्या टाले, प्रवीण देशमुख, प्रवीण वैष्णव, सरपंच प्रमोद वाकोडे, संदीप आवारे, राजेश ताथोड, डॉ. महेश खोट्टे, राजेश काटे, स्वप्नील सुरे, सागर गलास्कार, पाथरीकर, अजय गावंडे, सचिन थाटे, विनोद सगणे, शिवा दिंडोकार, योगेश जायले, सुरज शेंडोकार, निलेश जवकार, विठ्ठल वाघोडे,किशोर पाटील खुमकर, राजेश गावंडे,विक्की खुमकर यांच्यासह शेकडो समर्थक उपस्थित होते.
अनिल गावंडे हे अकोला जिल्ह्यातील हिवरखेड या गावचे मूळ रहिवासी असून गेली दोन दशके सामाजिक कार्यात आहेत. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची प्रेरणा घेऊन ते सामाजिक जीवनात उतरले. मा.पुरुषोत्तम खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली मराठा सेवा संघाची युवक आघाडी असलेल्या संभाजी ब्रिगेडपासून त्यांनी सामाजिक कार्याची सुरुवात केली. संभाजी ब्रिगेडच्या स्थापनेपासून ते या संघटनेत सक्रिय होते. तरुणाईला नवी दिशा देणारे अनेक उपक्रम त्यांनी अकोला जिल्ह्यात राबवले. यासोबतच त्यांनी मा. श्याम मानव यांच्या नेतृत्वाखाली अंधश्रद्धा निर्मूलन समितीतही अनेक वर्षे काम केले. सामाजिक कार्याची आवड असल्याने त्यांनी लोकजागर मंच या संघटनेची स्थापना केली. या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी आजवर अनेक महत्वाचे उपक्रम राबवले आहेत.
शेती प्रश्नाबद्दल काम करण्याला त्यांनी नेहमीच प्राधान्य दिलं आहे. त्यामुळेच त्यांनी प्रसिद्ध शेतकरी आंदोलक आणि विचारवंत अमर हबीब यांच्या प्रेरणे तुन शेतकरी विरोधी कायदे संपविण्यासाठी उभे राहिलेल्या किसानपुत्र आंदोलनातही ते सक्रिय आहेत. या आंदोलनाचे पहिले शिबीर त्यांनीच मुंबईत आयोजित केले होते. शेतकरी केवळ शेतीवर अवलंबून न राहता त्याला अन्य उत्पनांची जोड त्यांना मिळावी म्हणून त्यांनी कृषी आधारित उद्योगांची उभारणी करण्यास प्राधान्य दिलं आहे. लोकजागर मंचाच्या वतीने अकोला जिल्ह्यात एक दूध डेअरी उभी केली जात असून 50 हजार लिटर प्रति दिन क्षमतेची ही डेअरी असेल. लोकजागर महिला बचत गटाच्या माध्यमातून लघुउद्योग उभे करण्यात आले असून येथे चिक्की, मशरूम पापड, घरगुती मसाले यांची निर्मिती केली जात आहे.
ग्रामीण भागातील तरुण तरुनीना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि त्यांना संदर्भसाठी उपयुक्त पुस्तके मिळावीत म्हणून अकोला जिल्ह्यात 4 ठिकाणी मोफत अभ्यासिका आणि वाचनालय उघडण्यात आले आहेत.
अनिल गावंडे यांच्या पुढाकाराने मागेल त्याला शेतरस्ता ही योजना लोकजागर मंच ने राबविली. या अंतर्गत अनेक गावातील शेतांमध्ये लोक सहभागातून रस्ते बांधण्यात आले.रस्त्यावरील खड्डे हा नेहमीच डोकेदुखीचा गँभिर प्रश्न असतो..मात्र यासाठी सरकार दरबारी खेटे न घालता स्वखर्चाने अनिल गावंडे यांनी तेल्हारा ते अकोट या 40 किमी रस्त्यावरील खड्डे बुजवले. खड्डे बुजाव- जान बचाव ही लोक चळवळ त्यांनी यासाठी उभी केली.
अकोला जिल्ह्यातील हिवरखेड तेल्हारा हिवरखेड बेलखेड या गावांमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करूनच ते थांबले नाहीत तर या शिबिरात डॉक्टरानी सुचविलेली सर्व औषधे मोफत मिळतील अशी व्यवस्थाही त्यांनी उभी केली. विविध धार्मिक कार्यक्रमाच्या आयोजन करतानाच त्यांनी महिलांसाठी हळदी कुंकवाचे कार्यक्रम आयोजित केले. यात 2 हजारहुन अधिक महिला सहभागी झाल्या.
31 डिसेंबरला तरुणाई मद्यधुंद होऊन नववर्षाचे स्वागत करते. ही कुप्रथा संपविण्यासाठी दरवर्षी 31 डिसेंबरच्या रात्री दूध पार्टीचे आयोजन ही लोकजागरतर्फे केलं जाते. याला तरुणाई आता मोठ्या संख्येने हजेरी लावू लागली आहे. शिवसेनेत प्रवेश करून तरुणाई च्या विविध समस्या, रोजगार, रोजगाराभिमुख उद्योग निर्मिती, शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या अडचणी, ग्रामीण भागातील ज्वलंत प्रश्न यांच्या निर्मूलनासाठी काम करण्याचा संकल्प त्यांनी केला आहे.
अकोला जिल्ह्यात हे काम सुरू असतानाच ते गेली 15 वर्षेहून अधिक काळ मुंबईतही व्यवसाया निमित्त सक्रिय आहेत. त्यांच्या कामाची व्याप्ती कार्पोरेट क्षेत्रातही आहे. ते विविध कंपन्याचे प्रकल्प अंमलबजावणी आणि आखणी विषयक सल्लागार आहेत. या निमित्ताने त्यांना कार्पोरेट क्षेत्र आणि मंत्रालयातील विविध विकास कामे व योजनांच्या अंमलबजावणीसाठी पाठपुरावा करणे, या योजनांची आखणी आणि अमंलबजावणीतील अडचणी यांचा प्रदीर्घ अनुभव आहे. राज्याचे प्रशासन आणि राजकारण यांच्यातील घडामोडीशी ते जवळून परिचित आहेत. त्यामुळं त्यांच्या सारख्या प्रशासनाची जाण आणि ग्रामीण समस्यांचे ज्ञान असलेल्या लोकनेतृत्वाचे येण्याने ग्रामीण भागात विशेषतः विदर्भात शिवसेना भक्कम होण्यास हातभारच लागणार आहे.