कृषी मंत्र्यांच्या उपस्थितीत वरुडमध्ये पोळा साजरा शेतकरी-शेतमजूर बांधवांचा कृषी मंत्र्यांचा मनमोकळा संवाद

0
602
Google search engine
Google search engine

वरुड :-

कृषी संस्कृतीत महन्मंगल मानला गेलेल्या पोळ्यानिमित्त आज कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी वरुडनगरीचे ग्रामदैवत असलेल्या केदारेश्वर मंदिरात आयोजित पोळा उत्सवात उपस्थित राहून शेतकरी व शेतमजूर बांधवांशी संवाद साधला व सर्वांना पोळ्यानिमित्त शुभेच्छा दिल्या.
वरुड येथील पोळा उत्सवाला मोठी परंपरा आहे. श्रीमती डॉ. वसुधाताई बोंडे, केदारेश्वर मंदिराचे सचिव श्रीपाद चांगदे, नंदकिशोर पनपालीया, निळकंठ आंडे, भाजप शहराध्यक्ष राजू सुपळे, पत्रकार गिरीधर देशमुख, पोलीस ठाणेदार मगन मेहत्रे, युवराज आंडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
शंभरहून अधिक बैलजोड्यांसह शेतकरी बांधवांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. कृषीमंत्र्यांच्या उपस्थितीत तोरण तोडून उत्सवाचा आरंभ झाला. शेतकरी बांधवांनी विविध प्रकारची सजावट करुन बैल आणले होते. शेतकरी बांधवांत व नागरिकांमध्ये उत्साह ओसंडून वाहत होता. बैल सजावटीसाठी कृष्णराव वानखडे व तुषार बेलसरे यांना प्रथम पारितोषिक विभागून देण्यात आले. दुसरे पारितोषिक पंकज खेरडे व तिसरे राजूभाऊ ढोरे यांना देण्यात आले.
यावेळी शेतकरी व शेतमजूर बांधवांशी संवाद साधत पालकमंत्री डॉ.बोंडे म्हणाले की, शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. सांगली, कोल्हापूर परिसरात महापुराचे नैसर्गिक संकट उद्भवले. या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अविरत काम करून शेतक व नागरिकांना दिलासा दिला. कृषी विकासासह पायाभूत सुविधांची अनेक कामे जिल्ह्यात होत आहेत. सध्या पावसाची स्थिती बरी असून सप्टेंबरमध्ये पाऊस चांगला झाल्यास धरणातील पाणी साठा निश्चित वाढेल. त्यामुळे भविष्यातही वरुण राज्याची कृपा व्हावी अशी प्रार्थनाही कृषी मंत्र्यांनी यावेळी केली.